पान:सफर मंगळावरची.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्या बाबतीत आजी हळव्या झालेल्या. कोणीही झाडावर चढलेलं त्यांना अजिबात आवडत नसे. त्या हे सगळं प्रेमापोटीच करतात म्हणून कोणाला राग वगैरे येत नसे. झाडावर चढणारा एखादा तरबेज गडी गावात शोधायचा, फक्त त्यालाच झाडावर चढायची परवानगी होती. त्याने फळे उतरवली की आजी गावभर वाटत. लेकीसुनांची मिळून पंधरा नातवंडे सुट्टीत आल्यावर फारच गोंधळ घालीत. आजोबा कुठेतरी झोका बांधून देत तर त्यासाठी लागणारी भांडणे सोडविताना आजींना नाकीदम येत असे. मग आजी खोटेच रागावून कुठेतरी दूर जाऊन बसत.
 उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं यायची तेव्हा आंब्याच्या झाडाला हिरव्याकंच कैऱ्या लागलेल्या असत. मुलांच्या तोंडाला पाणी सुटत. पण आजी झाडावर चढून देत नसत. नुसतं पाहात बसण्याशिवाय इलाज नसे. जयू आणि मिलू कधीकधी झाडावर चढण्याचा आजीच्या नकळत प्रयत्न करीत पण त्यात फारसे यश येत नसे. एकदा आजी लेकीच्या सासरी लग्नासाठी जाणार होत्या. आज जयू आणि मिलूला खूप आग्रह केला. पण त्यांनी ठरवले होते, आजी गावाला गेल्यावर झाडावर चढायचे. म्हणून त्यांनी आजीला स्पष्ट नकार दिला. आणि वर सांगितले, अनु आणि प्राचीला ने. त्यांनाच लाडू आवडतात. आजी म्हणाली,
 "बरं बाबा, नका येऊ. पण झाडावर चढायचं नाही. मी बबनला सांगून ठेवते, तुमच्याकडं लक्ष ठेवायला."
 असा दम देऊन आजी गेली. मुलांनी सुटकेच निःश्वास टाकला. आता मात्र मुलांनी, त्यांच्याकडे सालाने कामाला असणाऱ्या बबनची पाठ धरली. त्याच्यामागे सारखा लकडा लावला. 'झाडावर चढायला शिकवा.' म्हणून. बबन म्हणाला,
 "आजी मलाच खवाळत्याल्या, कामावरनं काढून टाकत्याल्या."
 "आम्ही तुमचं नाव सांगणार नाही. "
 "बरं आप्पांना तरी विचारा. "

 मुलांनी आप्पांची परवानगी काढली. आप्पा हो म्हणाल्यामुळं मुलं हरखून गेली. जयू तर स्वप्न बघू लागला, आपण पांडू गुराख्यासारखं उंच फांदीवर पाय सोडून बसलोय, अन् बासरी वाजवतोय. रोहितला वाटलं, आपण मनीसारखं झाडावर चढून तिथेच चिंचा खायच्या. खाली उभा राहिलेल्या प्राचीला फक्त

७६ / सफर मंगळावरची