पान:सफर मंगळावरची.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाडावर चढून खा आंबे


 एक छोटसं खेडेगाव. गावाच्या शेजारून नदी वहाते. नदीच्या पाण्याने शेती पिकत, डोलत, बहरत. गावातील शेतकरी खाऊन पिऊन सुखी होते. तर अशा गावात एक वाडा होता. त्यांची नदीच्या किनारी भरपूर शेती होती. त्यात ऊसही पिकायचा. ऊसामुळे चार पैसे खिशात खुळखुळत. वाड्यात आईबाप, आजीआजोबा, लेकीसुना, नातवंडे असा मोठा गोतावळा नांदत असे. काही मोठी मुले तालुक्याच्या गावात शिकत. सुट्टीत ही शिकणारी मुलं, लेकींची मुलं, असा सगळा गोतावळा आला की आजी आजोबा मुलांत रमून जात. आजोबांनी नदीकिनारी अनेक प्रकारची झाडे लावलेली. त्यात आकाशाला भिडणारी निलगिरीची झाडे होती, लाल हिरव्या पानांची बदामाची झाडे होती, गोड पेरूची झाडे होती, गच्च लगडणाऱ्या चिकूची झाडे होती, लालकेसरी फुलांनी बहरलेली डाळींबाची झाडे होती, बेल, चाफा, गुलमोहर, मोगरा, जास्वंद, चिंच, निंब, अशी कितीतरी झाडे होती. वेली उभ्या आडव्या डोलत होत्या. उत्तरेला कळकाचं हिरवंगार बेट माजलं होतं. पश्चिमेला भलंमोठं, डेरेदार रसदार आंब्याचं झाड होतं. बागेशेजारी एक झोपडी सारखं छप्पर असलेलं छोटं घर असल्यामुळं आजी सकाळीच रानात यायच्या. रानात आल्या की, नेहमी बागेत जाऊन बसत. देवासाठी त्या रोज बेल, फुले नेत. आजींना झाडावर कुणी चढलेलं मात्र चालायचं नाही. कधी कोण झाडावर चढले तर आरडाओरडा करून गाव गोळा करत. त्यांच्या कुठल्यातरी नात्यातल्या, कुणाचा तरी, झाडावरून पडून पाय मोडलेला. त्यामुळे

सफर मंगळावरची । ७५