पान:सफर मंगळावरची.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "मी सकाळी नाष्ट्याला अफगाणी पराठा दही व काळा चहा घेतो. तर दुपारी जेवणात एखादेदुसरे फळ आणि दूध घेतो. रात्रीचं जेवण हलकं व साधं असतं. मांसाहार विशेष आवडत नाही. मद्यपान, धुम्रपान कधीच करत नाही. "
 "आपण एक धनवंत कुबेर पुत्र असून एवढं साधं खडतर आयुष्य जगताहात. अल्ला आपल्याला सद्बुद्धी देवो. सदा सलामत रखो. मी आपला आभारी आहे. "
 रोहित उठला. तसं ओसामा बिन लादेनने त्याचं कौतुकाने कपाळाचं चुंबन घेऊन आलिंगन दिलं. आणि म्हणाला,
 "बोल बेटा, तुला काय बक्षीस देऊ?"
 " मला काही नको. पण आपण काश्मीर प्रश्नात पाकिस्तानला मदत करू नये. काश्मीर आमचे प्राण आहे. काश्मिरीही भारताचेच आहेत. भारतात इस्लामला बिलकूल खतरा नाही. कृपया आपण समजून घ्यावं. "
 रोहित अजिबात न घाबरता तळमळीनं बोलत होता. खरं तर त्याला पाकिस्तान किती वाईट आहे, हेच सांगायचे होते, पण त्याने स्वत:ला आवरले.
 "ओके, ओके." असं म्हणत ओसामाने रोहितला निरोप दिला.
 त्याच्या डोळ्यावर पुन्हा जाड पट्टी बांधली. त्याने सगळे कागद नीट सांभाळून घेतले. आता पायऱ्या चढाव्या लागल्या. तो पायऱ्या मोजू लागला. त्याची चांगलीच दमछाक झाली. किती पायऱ्या, एक, दोन, तीन... एकशे अकरा, एकशे बारा, एकशे तेरा, एकशे चौदा, एकशे पंधरा...'
 रोहितची आई चहाचा ट्रे दिवाणखान्यात ठेवून रोहितला उठवायला गेली. तर हा आपला अंक मोजतोय. तिने रोहितला हलवून जागे केले. अन् म्हणाली, "एवढे कसले अंक मोजतोय ? किती धापा टाकतोयस ? स्वप्नात पण कसले खेळ खेळता काय माहीत ?"
 त्याच्या शेजारी बसत आई बडबडली. तिला काय माहीत रोहितचे स्वप्न कसले थरारक अनुभव देणारे होते. तो आभाळाला गवसणी घालून आला होता. एका खतरनाक दहशतवाद्याची मुलाखत घेऊन आला होता ते. तो आईच्या कुशीत शिरून झोपला. आणि विचार करू लागला. आपण ही मुलाखत लिहून काढायची असं त्यानं ठरवलं.

***
७४ / सफर मंगळावरची