पान:सफर मंगळावरची.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पट्टी सोडण्यात आली. पट्टी सोडल्यावर झगझगीत प्रकाशाने त्याचे डोळे दिपले. उजेडाला डोळे सरावल्यावर त्याला साध्या स्टुलावर, पांढऱ्या कपड्यात ओसामा बिन लादेन स्थानापन्न झालेले दिसले. रोहितला फार आश्चर्य वाटलं. त्या खोलीत भव्य दिव्य असं काहीच नव्हतं. भीती तर अजिबात वाटत नव्हती. रोहितने स्वत:ला सावरत आपली खरी ओळख सांगितली. दुभाषाकरवी दोघांची मुलाखत सुरू झाली.
 "ओसामासाहेब, तुम्ही खूप श्रीमंत आहात, तुम्ही अमेरिकेत इंजिनियरची पदवी घेतली. काही काळ तिथं काम सुद्धा केलंय. मग अचानक धर्माच्या नावाखाली असा विध्वंस करावासा कसा काय वाटला? धर्म तर नेहमी माणुसकीनं वागायला शिकवतो."
 "मैं अल्ला का बंदा हूँ. बस मुझे इस बारे मे जादा बात नही करना.
 " ठीकेय. तुम्ही एवढे साधे का राहाता ? "
 "मी अल्लाचा सेवक आहे. अल्लाच्या कामासाठी माझा जन्म झाला आहे.
अल्लाला चैन, ऐशआराम बिलकुल पसंद नाही. "
 “आपल्याला पकडण्यासाठी अमेरिकेने चार कोटींचे बक्षीस लावले आहे, यावर आपले मत काय ?"
 "अमेरिका आमचा शत्रू आहे. इस्लामचा शत्रू आहे. नेक काम करणाऱ्याला संकटे येणारच. अल्ला सलामत रखेगा. "
 "आपण भारताशी युद्ध का पुकारले ? भारतदेश तर अलिप्त राष्ट्र आहे."
 "आम्ही सगळे जग इस्लाममय करणार आहोत. पाकिस्तानला मदत म्हणजे इस्लामला मदत, अल्लाचे काम."
 "पण त्यामुळे निरपराध लोकांचे बळी जातात त्याचे काय ?"
 "अरे बच्चू, या धर्मकार्यात जेवढे बळी जास्त तेवढे पुण्य अधिक, यश अधिक. "
 "ओसामासाहेब आपली दिनचर्या सांगता का?"
 "इतर धर्मनिष्ठांप्रमाणेच मी लवकर उठतो. अल्लाची प्रार्थना करतो. दिवसातून पाच वेळा नमाज पढतो. पवित्र धर्मग्रंथांचं पठण करतो. पूर्वी मी नियमित व्यायाम व घोड्यावरून रपेट करायचो. पण रशियनांशी झालेल्या लढाईत थोडासा अधूपणा आलाय त्यामुळे आता व्यायाम बंदच असतो. "

 "आपल्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी ?"

सफर मंगळावरची । ७३