पान:सफर मंगळावरची.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुलाखत म्हणजे, मगरीच्या तोंडात जाऊन हरणाच्या पाडसाने दात मोजणे."
 "आई, बाबा, तुम्ही मला मदत करणारेय का नाही ?"
 रोहित रुसून बसला. मग आई-बाबांनी बोलून ठरवलं दुबईपर्यंत जायचं.
 सर्व तयारी झाली. रोहित आणि त्याचे आईबाबा दुबईला निघाले. मुंबई विमानतळावर निरोप घ्यायला त्याचे मित्र, बाकीचे सुपर सिक्स आलेले. आपल्या मासिकाचा अंक आता प्रचंड खपणार, म्हणून सगळे खूश होते. रोहितला सगळे, "बेस्ट ऑफ लक' म्हणत होते. नातेवाईकांनीही यशस्वी हो, जपून जा, सांभाळून राहा, वगैरे सूचना न विसरता वारंवार केल्या.
 सगळे सोपस्कार झाल्यावर ते विमानात चढले. पोटाला पट्टे आवळले. रोहितला छातीत धडधडू लागले. पण आता काय करणार? अंगावर घेतलेलं काम पार पाडायलाच हवं. आता ढेपाळून नाहीच चालणार. 'प्राण जाई पण वचन न जाई' असं काहीतरी आठवलं आणि त्याला स्फुरण चढले.
 दुबईला आल्यानंतर फोनाफोनी झाली. ओसामा बिन लादेनच्या भेटीची काय, कशी तरतूद केलीय याची नीट चौकशी केली. मग विमान कधी येणार, कुठे येणार वगैरे सगळं व्यवस्थित ठरलं. ठरल्या दिवशी त्यांच्याकडील विमान येईल, त्यात एकटा रोहित बसून जाईल ...
 आज रात्रभर रोहितला झोप नव्हती. मुलाखतीचा उद्याचा दिवस कसा उजाडतोय, आपण जिवंत परत येऊ का, आपल्याला बोलायचं नीट जमेल ना, असे अनेक प्रश्न सतावत होते. या प्रश्नांच्या युद्धाने रोहित बेचैन झालेला. रोहितचे आईबाबा तर भयंकर काळजीत होते. पण बालहट्टापुढे काय करणार ?
 सकाळी सर्वांनी आवरले. दुबई विमानतळावर रोहितला निरोप देण्यासाठी आईबाबा गेले. रोहितची कडक तपासणी झाली. अकराबारा वर्षाचा मुलगा एवढा धीट कसा काय ? आणि एवढा राक्षसी ताकदीचा ओसामा, ह्या चिमुकल्या भारतीय मुलाला मुलाखत द्यायला कसा तयार झाला ? ह्याचेच सगळ्यांना सर्वांना आश्चर्य वाटत होते. रोहितच्या आईला सारखं रडूच येत होती. ती मनातल्या मनात सारखी देवाची प्रार्थना करीत होती.

 ओसामा बिन लादेनचं विमान आकाराने इतर विमानापेक्षा छोटं होतं. त्या छोट्याशा विमानात बसल्यावर रोहितच्या पोटाला पट्टा तर बांधलाच पण डोळ्यावर जाड पट्टीही बांधली. तशी अटच होती. विमानातून उतरल्यावर त्याला कुठेतरी नेण्यात आले. नंतर मुबलक पायऱ्या उतरून आल्यावरच त्याच्या डोळ्यावरची

७२ / सफर मंगळावरची