पान:सफर मंगळावरची.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ओसामा बिन लादेनची मुलाखत!


 बाहेर पाऊस पडत होता. रोहित बाबांच्याजवळ युद्धाच्या बातम्या बघत बसलेला. इतक्यात टिंग टाँग ऽ दारावरची घंटी वाजली.
 आता यावेळी पावसात कोण पाहुणे आले असतील ? रोहितच्या आईला प्रश्न पडला. रात्रीची जेवणं नुकतीच झाली होती. स्वयंपाकघर आवरायचं चाललं होतं.
 "रोहित बघ रे कोणय ?"
 बाबांनी रिमोटवरून चॅनेल बदलत म्हटलं. रोहितने दरवाजा उघडला. तर बाबांचे दोघेतिघे मित्र, सोसायटीतच रहाणारे.
 "अरे, काय चालवलेस इथेच असून महिनाभरात दर्शनही नाही. म्हणून भर पडत्या पावसात तुला भेटायला आलो."
 "अरे, बसा, बसा. बरं झालं आलात ते. या युद्धामुळे कामाची ही धांदल वाढलीय. त्यात पाऊस. मग कुठे कसा भेटणार ?"
 "अरे संपले आता एकदाचे युद्ध. आपल्या सोसायटीकडून कितीची मदत पाठवायची, ते ठरवू."
 " तुम्ही ठरवा. मी किती देऊ?"
 युद्धाबद्दलच्या गप्पा चाललेल्या. मग रोहित तिथेच बसला. तेवढ्यात 'रोहित' म्हणून आईनं हाक मारली. रोहित आत आला. त्याला कारगिलच्या युद्धातील जवानांच्या गप्पा ऐकायच्या होत्या. तो कुरकुरतच आईला म्हणाला.
 "काय गं, बसतो की थोडा वेळ. "
 "काही नको. उद्या लवकर उठून पोहण्याच्या तलावावर जायचंय. आता सर्दी कमी झालीय. जवानांसारखं शूर व्हायचंय ना तुला?"

 रोहित मुकाट्याने झोपण्याच्या खोलीत गेला. अंथरूणावर मांडी घालून बसला. डोळे मिटले. झोपताना तो प्रार्थना करीत असे. आईने त्याला तशी सवयच लावली आहे. दोन मिनीटं झाली की, आई सांगायची. मग तो झोपायचा. आज जरा तंद्रीतच होता. प्रार्थनेच्याचवेळी त्याला युद्धच आठवत होतं. सकाळीच

६८ / सफर मंगळावरची