पान:सफर मंगळावरची.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 का ?"
 "हो." मिलींद खरं बोलला.
 मिलींदच्या असह्य पोटात दुखत होतं, त्यामुळे त्याला थापही मारता येईना.
 “हे बघ, आता बाहेरचं खाणं बंद कर. रोज नीट चावून पोळीभाजी, भाकरी, पालेभाजी, उसळी, सॅलड, कोशिंबीर, दूध, ताक, दही असंच खायचं. मैदानावर भरपूर खेळायचं. तुला सूर्यनमस्कार येतात का ?"
 "हो, येतात की पण रोज घालत नाही." आई म्हणाली.
 "आता तू बरा झालास की, रोज सूर्यनमस्कार घालायचे. तोपर्यंत मी दिलेली औषधं नीट घ्यायची आणि फक्त वरणभातच खायचा."
 "डॉक्टर, फार गंभीर आहे का ?" काळजीने आईने विचारले.
 "नाही, फार नाही. बरं वाटेल. उघड्यावरचं खाणं, तळलेलं मसालेदार देऊ नका. त्यामुळे पचनक्रिया बिघडते. "
 मिलींदच्या आईला फार अपराधी वाटलं. नोकरीमुळं आपण त्याच्याकडे लक्ष देऊ शकत नाही. त्याला शिस्त लावू शकत नाही. मिलींदला आईच्या मनातलं कळाल्यासारखं तो म्हणाला,
 "डॉक्टरकाका, मी आता बाहेरचं खाणं बंद करेल. फक्त घरातलंच आईनं केलेलंच खाईन.
 इंजेक्शन टोचल्यामुळं त्याला बराच आराम पडला होता.
 " हो रे. नेहमी आईच्या हातचं खावं. म्हणजे तब्येत स्ट्रॉंग होईल." डॉक्टर म्हणाले.
 "आभारी आहे डॉक्टर तुमची. येतो आम्ही." आई म्हणाली.
 "डॉक्टरला येतो कधी म्हणू नये." डॉक्टर म्हणाले.
 "हो, जातो." आई हसत म्हणाली.

***
सफर मंगळावरची । ६७