पान:सफर मंगळावरची.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "ब्रेड आणतोस का?"
 "आणतो, दे पैसे."
 असा सूर की ब्रेडही नकोय पण नाइलाजाने आणतोय. आईनं वीस रूपये दिले.
 "आई, उरलेल्या पैशाची भेळ खाऊ?"
 "खा. बाबा. "
 स्वत:जवळचे थोडे पैसे घालून मिलींदने भेळ खाल्ली. घरी आल्यावर चहा आणि ब्रेड खाल्ला. जेवणाला सुट्टी. केळ दिलं तर,
 "किती मऊ झालंय, काळंच पडलंय. "
 सफरचंद गोडच नाही, संत्र आंबटचय. हे असं नेहमीच सुरू. चार दिवसात जर बाहेरचं किंवा चमचमीत काही खाल्लं नाही तर लगेच मिलींद बेचैन व्हायचा. आकांडतांडव करायचा. बाहेरचं खाण्याची त्याला चटकच लागली होती.
 आज सकाळपासून मिलींदला मळमळत होतं. म्हणून तो शेवटच्या बाकावर बाईंना विचारून बसला. त्याचं कशातच लक्ष लागेना. पोटातही दुखायला लागलेलं. सहनच होईना. शेवटी तो बाईंना म्हणाला,
 "मी घरी जाऊ का बाई? पोटात खूप दुखतंय. "
 "अरे पण घरी तुझी आई नसणार, त्यापेक्षा इथेच शिक्षक खोलीत थांब. "
 "नको घरी जाऊन झोपतो म्हणजे बरं वाटेल. "
 "आईला निरोप पाठवू का?”
 "नको, संध्याकाळी येईलच की, तोवर कमी होईल. "
 घर जवळच होतं. मिलींद पाठीवर दप्तराचं ओझं घेऊन निघाला. घरी आल्यावर झोपला. पोट दुखणं वाढतच चाललेलं. आई येईपर्यंत कसेतरी झोपून, झोपावंसं वाटेना की इकडं तिकडं करत वेळ काढला. रडूनरडून चेहरा सुकला होता. डोळे लाल झाले होते. आईच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला.
 एकदाची आई आली. त्याची ती अवस्था पाहून भयंकर घाबरून गेली. आईला बघून मिलींदचे रडणे जोराजोरात सुरू झाले. आईने कोपऱ्यावरून रिक्षा आणली. त्याला दवाखान्यात नेलं. त्याच्या रडण्यामुळे डॉक्टरांनी त्याला लगेच तपासायला घेतले. लवकर आराम पडावा म्हणून इंजेक्शन दिलं. औषधं लिहून दिली. डॉक्टर म्हणाले,

 "काय रे, तू बाहेरचं नेहमी भेळबिळ असलं गाड्यांवरचं, उघड्यावरचं खातोस

६६ \ सफर मंगळावरची