पान:सफर मंगळावरची.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वस्तू तयार करतात, तशा वस्तू हा बाजीराव करत असे. बाजीरावाचं वैशिष्ट्य असं की तो आपली कला विकत नव्हता. केवळ आनंदासाठी या वस्तू तो तयार करत होता. कडब्याच्या कितीतरी वस्तू तो तयार करत होता. त्यात ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी, अशा कितीतरी वस्तू तो तयार करत असे. त्याला झाडपाल्याची औषधंही माहित होती. पकाक् पक या गाजलेल्या चित्रपटातला भुत्या याची आठपण येते, बाजीरावचं 'कडबाशिल्प' वाचल्यावर.
 सांताक्लॉज हा तर मुलांच्या खूप प्रेमाचा विषय. त्याचा उपयोग आपण 'सांताक्लॉज आणि राही' या कथेत उत्कृष्ट रितीने केला आहे. या कथेतला सांताक्लॉज हा देशी आहे. परदेशी नाही. या मातीतला आहे. मुलांना तो अधिक जवळचा वाटेल.
 सावित्री जगदाळे !
 या कथासंग्रहाचं लेखन-प्रकाशन केल्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन, कौतुक करतो. वाचनसंस्कृतीचा -हास होत आहे. ती नष्ट पावत आहे. अशी आता सर्वत्र हाकाटी होत असतानाही तुम्ही हा सांस्कृतिक खटाटोप करून या हाकाटीला विधायक उत्तर दिले आहे.
 तुमच्या लेखनाची आणि कथासंग्रहाची काही बलस्थाने आहेत. ती प्रथम सविस्तरपणे सांगून मगच काही उणीवांचीही नोंद करतो.
 तुमच्या या कथासंग्रहाचे प्रथम बलस्थान म्हणजे आशयघनता !
 संपन्न आशयामुळे हा कथासंग्रह समृध्द झाला आहे. या आशयाचेही मग विविध पदर आहेत. त्यात नातीगोती आहेत, स्वभावरेखा आहेत, निसर्ग आहे, विविध स्थळं, घटना, प्रसंग आहेत. आणि प्रसंगी विश्वाखालचे सगळे काही आहे. एखाद्या वस्तुसंग्रहालयात प्रवेश केल्यावर अनेक प्रकारच्या वस्तू पाहून डोळे विस्फारून जावेत त्याप्रमाणे तुमच्या कथेतील आशयघटक आहेत.
 या लेखनाचे दुसरं बलस्थान म्हणजे वर्णनशैली !
 मुलांना वर्णनं खूप आवडतातः व्यक्ती, घटना, प्रसंग यांची उत्तम व अतिशय प्रत्ययकारी वर्णनं तुम्ही केली आहेत.
 तिसरे बलस्थान म्हणजे भूतकाळ व भविष्यकाळ यांचे वर्तमानाशी घट्ट नाते राखून केलेले वर्णन !
 अनेक कथांमध्ये कल्पनाविलास असला, भूतकाळातील प्रसंग असले तरी त्यांची नाळ वर्तमानाशी जोडलेली आहे. 'मंगळावरची सफर' या कथेत याचा