पान:सफर मंगळावरची.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 उन्हाळ्याची सुट्टी आणि सुट्टीतील मजा हा मुलांचा आवडता विषय असतो. कै. वि. वि. बोकील यांनी वसंत आणि ना. धों. ताम्हणकर यांनी गोट्या या पात्राच्या माध्यमातून मुलांची सुटीतील कामगिरी खूप सुंदर रितीने मराठी बालसाहित्यात ग्रंथित केली आहे. त्या थोर लेखकांनी निर्माण केलेल्या आवडत्या पात्रांचीच आठवण व्हावी अशा काही कथा या संग्रहात आहेत. उदा... झाडावर चढून खा आंबे या कथेत ओका छोट्या खेडेगावातला निसर्ग, आणि मुलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याचा घेतलेला मनमुराद आनंद याचं सुरेख चित्रण आहे. मुलांना प्रोत्साहन देणारी पण तितकीच मुलांची काळजी घेणारी आज्जी मनाला चटका लावून जाते.
 हेलन केलर यांचं कार्य सर्वांनाच माहित आहे. पण त्यांचं लहानपण 'बाळ हेलन' या गोष्टीतून कळतं. तिचा, तिच्या पालकांचा संघर्ष अंगावर शहारे आणतो.
 'असा मी... तसे ते '... हे कथासप्तक वाचनीय आहे. यातील नायक स्वतःला इतरांच्या संदर्भात बघत असतो, शोधत असतो. त्यावेळी त्याच्या भावभावना कशा असतात, त्याचे मनोव्यापार कसे चालतात याचे चित्रण तुम्ही उत्तम रितीने केले आहे. आई, ताई, बाबा यांचे या मुलाशी भावबंध कसे आहेत, त्याच्या बालसुलभ अंतरंगात कोणते तरंग उमटत आहेत याची प्रत्ययकारी जाणीव वाचकांना होत राहील. मोठी माणसं एवढ्या कसल्या गप्पा मारतात याचं कुतुहल मुलांना नेहमीच असतं. हीच भावना 'असा मी' च्या चवथ्या भागात व्यक्त केली आहे. मावशी आणि आई यांच्या गप्पांचं अप्रूप मुलाला वाटत आहे.
 'विठू वारकरी' हे एक सुरेख व्यक्तिचित्रण आहे. साधाभोळा, गरीब विठू आणि त्यांचं भावजिवन या कथेत उत्तम रितीने रंगविले आहे. फाटकी पैरण आणि खाकी अर्धी विजार असा वेष असलेला विठू आहे सततद्योगी. विठूचा गबाळा अवतार, त्याचं विक्षिप्त वागणं आणि मुलांची त्याची हमरीतुमरी या कथेत रंजकतेनं मांडली आहे. एका सिंधी कथेवर आधारलेली ही कथा मुलांना नक्कीच आवडेल.
 'कडबाशिल्प' हे कथेचं नाव बुचकळ्यात टाकणारं आहे.
 कडबा तो काय...
 आणि त्याचं शिल्प कसलं... असा रास्त प्रश्न उभा करणारी ही कथा आहे. एका वेगळ्या वाटेवर घेऊन जाते. वैरणीची पिवळी ताटं, उरलेला कडबा, त्यातून हा एक बाजीराव कलावस्तू तयार करीत असतो. मॅकोनोपासून जशा विविध