पान:सफर मंगळावरची.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घोळ्यामेळ्याने राहावं.


 "ए बगळ्या, तू फिल्डींग करायचं.” राजू बगळ्यावर गरजला.
 "मी नाही रोज रोज, नुसतीच फिल्डींग करणार." बगळ्या रडवेल्या आवाजात म्हणाला.
 "जास्त शहाणपणा करायचा नाय. तुझा नंबर आला की तू बॅटींग करायचंस समजलं?"
 राजून दम भरला.
 "माझा नंबर आला की तुम्ही खेळ बंद करता."
 "खेळायचं असेल तर खेळ न्हायतर फूट." राजूने पायाजवळचा दगड बॅटने उडवून लावला. राजूची दमबाजी ऐकून बगळ्या मुकाट्याने लाँगलेगकडे जाऊ लागला. तसा राजू ओरडला,
 "बगळ्या एक्स्ट्रा कव्हरकडे जा, चिंटू तू विकेटकिपर, श्री तू लागलेगकडे जा. कुलदीप तू बॉलींग करायचं." राजूने हुकूम सोडले.
 हे नेहमी असंच असतं. राजूच्या मनात आलं की तो सगळ्यांना बोलावणार. राजू बोलावतोय म्हटल्यावर सगळे पटापटा गोळा व्हायचे. त्याचं क्रिकेटचं संपूर्ण कीट असल्यामुळे पहिल्यांदा बॅटींग त्यालाच. तो नंतरही त्याच्याच इच्छेप्रमाणे कुणालाही बॅटींग देणार. बगळ्या सगळ्यात लहानखुरा, हाडकुळा, भाबडा, वयानेही लहानच लिंबू - टिंबू. पण बगळ्याच्या आईची आणि राजूच्या आईची मैत्री. त्यामुळे बगळ्याची आई राजूला हक्काने सांगायची,
 "अरे, राजू आमच्या बगळ्याकडे लक्ष ठेवत जा हं."
 "काकू तो माझं ऐकत नाही मग कसं ठेवू लक्ष ?”
 "काय रे बगळ्या, राजूदादाचं सगळं ऐकायचं, तू लहान आहेस."

 त्यामुळे बगळ्याला राजूचं म्हणणं मान्य करावंच लागायचं. बाकीची मुलं राजूपेक्षा लहानच होती. त्यांच्याकडे पण साध्या लाकडी बॅटशिवाय फारसं काही नव्हतं. बॉलसुद्धा राजूचाच असायचा. राजूचे बाबा अगदी उदार आहेत. सगळ्या सोसायटीतली मुलं आपलीच आहेत, खेळू देत. ते राजूला एक चेंडू

६०। सफर मंगळावरची