पान:सफर मंगळावरची.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


प्रस्तावना


 सौ० सावित्री जगदाळे

 स्नेहपूर्वक आशिर्वाद
 सफर मंगळावरची आणि इतर गोष्टी हा कथासंग्रह मी वाचला. या संग्रहाला मी प्रस्तावना लिहावी अशी तुमची विनंती मी मान्य केली. याचं कारण असं की, साहित्याच्या क्षेत्रात आणि विशेषतः बालसाहित्याच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या कोणालाही प्रोत्साहन देणं हे मी माझं प्रथमकर्तव्य समजतो.
 या संग्रहातील तेहतीस कथा म्हणजे मुलांसाठी मेजवानीची तेहतीस ताटं आहेत. आणि प्रत्येक ताटात वेगळा खाऊ, वेगळं पक्वान्न आहे.
 या कथासंग्रहाला पहिल्याच कथेचं नाव दिलं आहे. मानसी आणि सौरभ या धाडसी मुलांनी स्वप्नात का होईना.. पण मंगळावरचा प्रवास केला. ही घटना कथेत उत्तम रितीने गुंफलेली आहे. सध्या विज्ञानयुग चालू आहे. मुलांना चमत्कार आवडतातच. विज्ञानातील चमत्काराचा त्यांना परिचय झाला तर त्यांची बौध्दीक संपदा अधिक वृध्दिंगत होईल. या कथेने हेच कार्य साध्य होईल.
 दुसरी कथा तेजस्वी चंद्रबिंबाची आहे. सरत्या सहस्त्रकातील शेवटचं तेजस्वी चंद्रबिंब पाहताना सर्वांचं भान हरवलं होतं. हा अनुभव रोमांचकारी आहे.
 मुलांना व्यायामाचं महत्त्व सांगणारी 'दणकटपणा,' 'आई पडते आजारी' या कथेत मुलं आईला विश्रांती घ्यायला सांगतात आणि स्वतः कामं करतात, 'वाचाल तर वाचाल' आणि 'चमत्कार' या दोन्ही गोष्टीमध्ये वाचनाचे महत्त्व अतिशय सुंदर, मनोरंजक पध्दतीने विषद केले आहे. ओसामा बिन लादेनची मुलाखत वाचून थरारक अनुभव येतो. मुलं वाचता वाचता विचार करतील, चांगलं काही करण्यास प्रवृत्त होतील. वाचनाची गोडी लागेल. आवड निर्माण होईल.