पान:सफर मंगळावरची.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असते. कळत नाही. शाळेत जायचं म्हटलं की, त्याच्या अनंत तक्रारी. 'बसच येत नाही लवकर, गर्दी असली की थांबत नाही. रिक्षा लावू या म्हटलं की, "रिक्षावाला लवकर येत नाही, मुलांना कोंबून भरतो. स्कॉलरशीपची शिकवणी होईपर्यंत थांबत नाही, मग बसनेच यावे लागते. शाळेत नीट शिकवतच नाहीत, मुलं दंगा करतात. "
 "मग तू ही त्यांच्याबरोबर दंगा करत जा." एकदा आई म्हणाली.
 "मला नाही आवडत तसली दंगामस्ती."
 "मग कसली आवडते ?" चिडवत आई म्हणाली.
 "आँ SS" श्री चिडत ओरडला.
 "त्याचं काय पण चालुदे, तू अभ्यास, वाचन करीत जा."
 "गोंधळात लक्ष तरी लागेल का ?"
 अशा सारख्या कटकटी. शाळेत तरी जायलाच हवं. एक गोष्ट समजावून सांगितली की, त्याविरुद्ध हजार प्रश्न. त्याबद्दल लाखभर अडचणी सांगणार घरात बस म्हटलं, तरी करमत नाही. खेळायला गेम नाहीत. पुस्तकं वाच म्हटलं की, अवघड भाषा असतेय, शब्दांचे अर्थ कळत नाहीत. असं सारखं किरकिरत रहायचा. श्रीच्या आईला वाटायचं. हा असं का करतोय ? ह्याच्यासाठी मी एवढं कष्ट करतेय, हवं नको ते पहातेय, तरी हा नेहमीच अस्वस्थ. काय करावं ?

 खरं तर श्रीनं एखादी गोष्ट मनात आणली तर सगळ्या अडचणीवर मात करून ती गोष्ट पूर्ण करतो. शाळेच्या बाबतीत मात्र हल्ली असं का करायला लागलाय ? शाळेतलं शिकवणं, शिक्षकांचा स्वभाव, मुलांची संख्या, त्यामुळे होणारं दुर्लक्ष. हे सर्व बदलणं अशक्य होतं. आणि शाळा बदलून तरी या गोष्टी बदलणार आहेत का? यावर उपाय तरी काय करावा ? आई सारखा विचार करीत होती. जी गोष्ट आपल्या आवाक्याबाहेरची आहे ती स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय तरी असतो का ? त्यामुळे एवढं सहन करायलाच हवं. पण हे त्याला पटवून कसं द्यायचं ? वयात येताना असा बदल होतो हे त्याच्या आईनं कुठं कुठं वाचलेलं. पण अशावेळी नेमकं काय करायचं असतं हे तिला तरी कुठ माहीत होत ? त्यामुळे त्याची आईही सध्या सारखी अस्वस्थ व्हायला लागलेली. अधून मधून उपदेश करायची. पण तो बोअरच व्हायचा. एकदा आईने त्याला सानेगुरुजींची गोष्ट सांगितली.

५८ / सफर मंगळावरची