पान:सफर मंगळावरची.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चमत्कार


 "आई गं ऽ खूप गुडघा दुखतोय. चालायला पण येईना. "श्री रडत रडत म्हणाला.
 “काय रे, काय झालंय गुडघ्याला ?" आईने घाबरत विचारलं.
 "बॉल लागलाय." मग चेंडू कसा कसा लागला वगैरे प्रात्यक्षिकासहित श्रीने आईला सांगितलं. पुन्हा विव्हळत म्हणाला. फार दुखतंय ग ऽ आईनं जरासं अमृतांजन चोळलं तरी ह्याचं विव्हळणं वाढतच चाललेलं.
 "अरे आटप लवकर शाळेची वेळ झाली."
 “आई आता कसं ग जाऊ ? आऽ हा ऽ"
 आईला वाटलं लागला असेल जोरात चेंडू, उगाच शाळेत काय झालं म्हणजे...बुडली एक दिवस शाळा तर काय बिघडत नाही. मग तिनं वेदनाशामक गोळी त्याला खायला दिली. आधी त्याला पोटभर जेवायला घातले. जेवून श्री खाटेवर आडवा झाला. तीन वाजेपर्यंत डाराडूर झोपला. उठल्यावर लंगडत लंगडत म्हणाला,
 "पोहायला जातो मी. "
 “अरे पण गुडघा दुखतोय ना?"
 "पोहातना कसा दुखेल ? चालताना दुखतोय."
 "मग जाणार कसा?"
 “सायकलवरून."
 लंगडत, लंगडत त्याने पोहण्याचे ओळखपत्र, कॉश्चूम, साबण, टॉवेल वगैरे गोळा करून पिशवीत भरू लागला. आईने काही मदत केली नाही. तरी गेला पोहायला. गुडघा दुखतोय तरी गेला पोहायला. नवीन शिकायला जायचा तेव्हा सारखी धुसफुस, पाणी गार लागतं. सर रागावतात, पाण्यात ढकलतात, खोलात जायला सांगतात, मला भीती वाटते, मी नाही जाणार.' वगैरे. काही वेळा तर आईला थांबवून घ्यायचा.

 नंतर सुट्टीत मुलांच्याबरोबर जाऊन जाऊन सवय लागली. आता जरा वेळ मिळाला की पळतो. दोन वेळा दुप्पट पैसे देऊन पोहतो. शाळा तेवढी का नको

सफर मंगळावरची । ५७