पान:सफर मंगळावरची.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जागेवर पालथा घालता. काचेचा पेला भांड्यात ठेवला की फुटून जातो. म्हणून लगेच पेला धुऊन पालथा घालूनच ठेवायचा. अशी सवयच लावली होती आईने गौरवला
 "अरे बाप रे. मला कुठे जेवण करता येतं. फक्त खाता येतं." बाबा बिस्किट खात म्हणाले.
 "मग तुम्ही गोष्ट वाचून दाखवा, आई स्वयंपाक करेल." गौरव म्हणाला “ही कल्पना छानय." चहाचा कप तोंडाला लावत बाबा म्हणाले.
 गौरवने गोष्टीचे पुस्तक आणून बाबांकडे दिले, व म्हणाला, "चला आज टी.व्ही. बघायचा नाही. " गौरवने बाबांना हाताला धरून नेले. तेव्हा, 'कशी जिरली' असं मनात येऊन आई गालात बारीक हसत होती.
 गौरवच्या बाबांना रोज गोष्ट वाचून दाखवायचे काम लागले. एकदा बाबांनी त्याच्या पाठ्यपुस्तकातील मराठीच्या पुस्तकातील धडाच वाचून दाखविला. म्हणाले,
 "मनोरंजन आणि अभ्यास, एका दगडात दोन पक्षी."
 तेव्हापासून गौरव आईच्या मागे लागला.
 "आई, तूच वाचून दाखव. बाबा नीट वाचत नाहीत."
 "माझा स्वयंपाक होऊ दे, मग वाचते राजा." आई कुकर लावत म्हणाली.
 स्वयंपाक झाला की जेवणं, मग झाकपाक, आवराआवरी. तोपर्यंत गौरवला झोप अनावर व्हायची. तो 'आई चल की.' अशी भुणभुण लावायचा. आई म्हणायची. 'तू सुरू कर वाचायला मी आलेच.'
 असं करून गौरव वाचू लागला. पुस्तकातले परी, राक्षस वेगवेगळे प्राणी, पक्षी त्याला सारखे खुणावू लागले. एकेक दिवशी पूर्ण पुस्तक वाचून झाले तरी आईचं काम आवरायचं नाही. शेवटी त्याने आईच्या मागे लागण्याऐवजी स्वतःच गोष्टी वाचण्याचे ठरविले. चांगल्या गोष्टी ठरवूनच चिकाटीने कराव्या लागतात. म्हणजे त्याची सवय लागते. गौरवलाही पुस्तक वाचण्याची सवय लागली. चांगली पुस्तके बाबा आणून देत. ते वाचण्यात तो रमून जात. टी. व्ही. बघण्याचे आपोआप कमी झाले. वाचनामुळे गौरवाचा खूप फायदा झाला. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, त्याला निबंध सहज, व्यवस्थित लिहिता येऊ लागला. व्याकरण चांगले समजू लागले. बाकी विषयांचे आकलन चांगले होऊ लागले. सामान्य ज्ञान चांगले झाले. त्यामुळे त्याला अभ्यासाचा कंटाळा येत नव्हता. गौरव एक हुशार, अभ्यासू विद्यार्थी म्हणून ओळखला जाऊ लागला. एकूण काय वाचण्यामुळे त्याचे जगणे समंजस, अर्थपूर्ण झालं.

***
५६ / सफर मंगळावरची