पान:सफर मंगळावरची.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाचाल तर वाचाल


 "आई, बघ की पेपरमध्ये काय लिहिलंय, “वाचाल तर वाचाल ! म्हणजे काय गं?”
 गौरव हातात वर्तमानपत्र घेऊन आईकडे आला. गौरवची आई पोळ्या लाटत होती. तिने सकाळीच चहा पिताना पेपर चाळला तेव्हा ही बातमी वाचली होती. कुणीतरी थोर लेखकाने भाषणात सांगितलेले छापून आले होते.
 "अरे दोन 'वाचाल' चे दोन वेगवेगळे अर्थ आहेत."
 "दोन अर्थ ?"
 आश्चर्याने आधीच मोठे असलेले डोळे आखणीन मोठे करीत गौरव म्हणाला.
 "हो, पहिल्या 'वाचाल' चा अर्थ, लिहिलेलं वाचाल तर आणि दुसऱ्या 'वाचाल' चा अर्थ चांगलं जगू शकाल. किंवा 'मरता मरता वाचाल' असं म्हणतो की नाही आपण, तसं ."
 गौरवच्या आईनं लाटलेली पोळी तव्यावर टाकली अन् कणकेचा उंडा करू लागली. दुसऱ्या उंड्याबरोबर दुसरा प्रश्न.
 "पण आपण तर पोळी खाऊन, पाणी पिऊनच जगतोना ?"
 "तसं नव्हे रे, जगायला खाणं पिणं आवश्यक आहेच. ते सगळेच सजीव करतात. पण ह्या सगळ्यांपेक्षा माणूस वेगळा आहे. बुद्धीमान आहे. विचार करणारा आहे. हो की नय!” आईनं दुसरी पोळी गोल लाटत म्हटलं.
 "हसणारासुद्धा आहे." गौरवने भर घातली. "पण ह्यामुळे आपण वाचल्याशिवाय वाचू शकणार नाही हे कसं गं ?"
 उंड्याची पोळी जशी मोठी होत जातेय, तसे गौरवचे प्रश्न विस्तारत जात होते. गरम पोळीवर गुळतूप घालून त्याची गुंडाळी गौरवच्या हातात देत आई म्हणाली,

 "बघ हं आता, आपण चांगलं चुंगलं खाल्लं की शक्ती मिळते. बुद्धी तरतरीत राहाते. तसंच वाचल्यामुळे आपल्या विचारांना दिशा मिळते. आपण अडाणी राहात नाही. चांगलं काय, वाईट काय ते कळतं. पोळी खाल्ल्यावर आपल्या पोटाची भूक भागते. तसं वाचल्यामुळे आपल्या बुद्धीची भूक भागते."

५४ / सफर मंगळावरची