पान:सफर मंगळावरची.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बायकांत चर्चा सुरू, गवत खूपच वाढलेय. आपली मुलंही क्रिकेट खेळतात आणि बॉल हुडकायला गवतात जातात. असल्या गचपनात काहीही बसलेलं असतं.
 “आपणच गवत काढायचं का ? इथं काही महानगरपालिका लक्ष घालणार नाही. "
 "हो ना. आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवायला हवा."
 "काढूयात की. स्वच्छता होईल. इच्चू-काट्याची भीती तरी राहणार नाही."
 असं म्हणत आत्यांनी भरभर काँग्रेसचं गवत काढायला सुरुवात केली. मग शेजारच्या जोशीकाकू, पवारकाकी, देशपांडेमामी, अशा सगळ्याच मदतीला आल्या. कामतआजीदेखील आल्या. गप्पा मारत कौतुक करू लागल्या. मुलं काढलेलं गवत नेऊन टाकत होती. सगळ्या बायका गवत काढत होत्या गप्पांना चांगलाच रंग भरला. कट्ट्यावर बसलेली मुलंही मग आपापल्या घरातली खुरपी, विळे, माती उकरणे काही सापडेल ते घेऊन येत होती. आता काम कमी, हात जास्त झाले. दोन तासात आवार साफसूफ झाले. सगळ्यांनाच खूप छान वाटत होते. गवत तर उगवतच राहणार. आणि त्या गवतात कचराही लोक टाकत राहणार. मग ठरले, भिंतीच्या कडेने माती टाकून झाडे लावूया म्हणजे खिडकीतून कोणी कचरा टाकायला धजवणार नाही.
 झालं. भिंतीच्या कडेची सफाई सुरू झाली. सफाई झाल्यावर माती आणायला घमेली, पातेली घेऊन सगळे गेले. शेजारीच मैदान होते. मैदानाच्या कडेची माती आत्या, मामी, काकींनी उकरून दिली. स्वप्नाली, ज्योती वगैरे मुलींनी मोठेमोठे दगड घोळून बाजूला काढले. मुलांनी माती आणून भिंतीच्या कडेला टाकली. मामांनी मग कडेने विटा लावून पाणी मारले. आता कुणी कुठली रोपे आणून लावायचं ठरलं.
 सगळे कसे मजेमजेने झाले. मुलांना बोलवावं लागलं नाही. हे करा, ते करा असं सांगावं लागलं नाही. खाऊ खाताना जसं तू तू मी मी करतात, तसंच काम करतानाही करत होते. मोठ्यांनी थोडासा वेळ काढून मुलांशी संवाद साधला तर ही लहानगी मुले इकडचा डोंगर तिकडे करतील. सामुदायिक श्रमदानाने मनोरंजनही होईल.
 सगळ्या मुलांना आत्यांनी खाऊ दिला. खाऊ खाता खाता भुलं म्हणाली,

“आम्ही दर रविवारी एक-दोन तास अशीच साफसफाई करू.'

५२ / सफर मंगळावरची