पान:सफर मंगळावरची.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चांगली झोप झाली होती. आता मळमळणे खूप कमी झाले होते. पण अशक्तपणा वाटत होता. निमाने सौरभला दूधबिस्किटे दिली. आईला व स्वत: ला चहा केला. सौरभ कुरकुरलाच. "तुला का दूध घेत नाहीस, मला एकट्यालाच दिलेस ?"
 "काय रे सौरभ ?"
 आईनं आवाज देताच सौरभ न्हाणीघरात पळाला. आज न सांगता कपडे बदलून हातपाय धुतले. डबा काढून कट्ट्यावर ठेवायला गेला तर भांडी बेसीनमध्ये तशीच.
 "आई, कामवाली आली नाही का गं?"
 "नाही आली. आणि कामवाली नाही म्हणायचं तिला, मदतनीस म्हणायचं. तिला माहितच नसेल आपण आलोय ते. "
 "धुणं पण तसंचय." निमा म्हणाली.
 "असू दे, उद्या धुवेल. "
 आईचा आवाज अशक्तपणामुळे खोल गेलेला.
 "निमा कुकर लावतेस का ? आज फक्त मुगाचे वरण आणि मऊ भात खाऊ या."
 "कुकर पण लावते न् भाजी चपाती पण करते की. "
 नमाने डाळ, तांदूळ काढून निवडून, धुवून आईला दाखवून पाणी घातले. कुकरमध्ये पाणी घालून गॅसशेगडीवर कुकर ठेवला.
 "सौरभ, तू काय काम करतोस?" आईनं विचारलं.
 "मी मदत... मदतनीसाचं काम करतो."
 "म्हणजे रे काय ?"
 "मी भांडी घासतो. "
 त्याला वाटले, ताई कुकर लावतेय न् चपात्याही करतेय. तर आपण कट्ट्यावरची भांडी तरी घासावीत.
 "हँऽ आलाय मोठा भांडी घासणारा." नीमा त्याला चिडवत म्हणाली.
 "तुला काय वाटले. मला येत नाहीत भांडी घासायला ? आई, मी एकदा कामवाली, चुकलं, चुकलं मदत... मदतनीस आली नव्हती तेव्हा तू घासली न् मी धुतली होती की नाही ?"
 सौरभ तावातावाने बोलत होता. आई कौतुकाने म्हणाली,
 “हो रे, चांगली धुतली होतीस. मन लावून काम केले की चांगलेच होते. "

 "आज एकट्यानेच घासून आणि धुवून पण दाखवायची. कळलं?" नीमा

सफर मंगळावरची । ४९