पान:सफर मंगळावरची.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "कर सगळ्यांनाच."
 डोळे मिटून, कपाळावर आडवा हात ठेवून ती पडून राहिली. सौरभ काळजीनं आईजवळ आला न् म्हणाला,
 "आई, तुला बाळ होणारे का ?"
 तशातच आईला हसू आलं. ती म्हणाली.
 "गाढवा मी आता म्हातारी होईल की. आता कसं बाळ होईल?"
 सौरभला एकदम हुश्श वाटलं. तो दात घासायला पळाला. नीमानेही दात घासून चहा केला. चहा पिल्यावर आईला जरा हुशारी वाटली. तिनं उठून चपात्या केल्या. सौरभने आज सगळे पटपट आवरले. पटकन अंघोळ करून गणवेष इस्त्री करून घातला. दप्तर आवरले. निमाने चादरीच्या घड्या घातल्या. मुरांबा, चटणीबरोबर दोघं जेवले. डब्यातही तेच घेतलं. सौरभला आईची काळजी वाटत होती. तो म्हणाला,
 "आई, मी थांबू घरीच ? आपण डॉक्टरांकडे जाऊ या."
 "नको. साधा पित्ताचा त्रास होतोय. एकदा पित्त सगळे पडून गेले की बरं वाटेल. "
 "कसं गं पडेल पित्त ?"
 "आणखी दोनचार उलट्या झाल्या की बरं वाटेल."
 "बापरे. मग मी जातच नाही शाळेत, तुला पाणी द्यायला, डोकं धरायला नको का कोणी ?"
 "नको रे राजा." आई सौरभला जवळ घेत म्हणाली, "एवढं काय होत नाही. तसं जास्त झालं तर मी आपल्या कामतांच्या डॉ. ताईकडून औषध घेईन की."
 " जाता जाता सांगू का ताईला ?”
 "अरे बाळांनो एवढासा तर त्रास होतोय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता पळा शाळेला. म्हणजे मी आराम करते. परवाच्या जागरणामुळे तर त्रास होतोय. चांगली झोप झाली की बरं वाटेल."

 दोघेही शाळेत गेले. परवा गावाकडे लग्नात तेलकट वगैरे खाणं, दगदग, जागरण, प्रवास या सगळ्यामुळे त्रास होतोय. सौरभचे बाबा मागेच थांबले होते. मुलांची शाळा म्हणून तिघांना पुढं पाठवून दिलं होतं. उद्यापर्यंत त्यांचे बाबा येतील. सौरभच्या आईने पांघरूण घेऊन डोळे मिटले. चांगली गाढ झोप लागली. कामवाली एकदोनदा दारावरची घंटी वाजवून गेली. शाळेतून निमा, सौरभ आले. तोपर्यंत आईची

४८ / सफर मंगळावरची