पान:सफर मंगळावरची.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दृश्य दिसलं. दोन लहान मुले व त्यांच्या आया कडेवर आणखी एकेका बाळाला घेऊन उभ्या असलेल्या. कपडे फाटलेले, मळके. त्यांनी कित्येक दिवसात अंघोळ केली नसेल. अपूर्वा हात धुवायचं विसरून त्यांच्याकडेच पाहात राहिली. त्यांतील एक मुलगी तर अपूर्वा एवढीच होती. अपूर्वाकडे कुतुहलाने डोळे मोठे करून बघत होती. त्यांच्यातील मोठी बाई म्हणाली,
 "माय, वाढा की."
 अपूर्वा भानावर आली. ती आईला म्हणाली,
"आई, त्यांना थोडंसं दे ना."
  "अगं, लग्न का आपल्या घरचं आहे?" बाईकडे दुराव्याने पाहात म्हणाली, "नंतर वाढतीलच ना.” असं म्हणून आत गेली. अपूर्वा आईच्या मागे जाता जाता विचार करत होती, त्या मुलांना भूक लागली असेलं.
 "आई, त्या काकांना मी सांगू का वाढायला ? त्यांना भूक लागली असेल ना गं?" अपूर्वा आर्जवाने म्हणाली.
 "बघ त्या आचारीमामांना विचारून, भात वाढ जा."
 अपूर्वा आचान्याकडे पळतच गेली.
 "आचारी मामा, भातबीत द्या ना जरा."
 ती लग्नघरातील असावी असं वाटून, त्याने विचारले,
 "कशाला वो ताईसायेब ?"
 "हवाय मला. टोपलीत द्या.
 एका वाढण्याकडून भाताची टोपली घेऊन तिच्याकडे देत आचारी म्हणाला.
 "ही घ्या टोपली. नंतर हितंच आणून द्या."
 “होऽ”
 असं म्हणत तिनं लाडूच्या ढीगातले चार-पाच लाडू घेतले, अन् ती त्य भिकाऱ्यांच्या भांड्यात भात आणि लाडू वाढू लागली. त्यांचे आनंदाने फुललेले चेहरे पाहून अपूर्वाला खूप बरं वाटलं. इकडे आई हाका मारत आली. म्हणाली,
 "चल लवकर. इथं काय करतेस?"
 "त्यांना भात वाढला.” अपूर्वा सहजपणे म्हणाली.
 आई आपल्या लेकीकडं कौतुकाने पाहू लागली.

***
४६ / सफर मंगळावरची