पान:सफर मंगळावरची.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भुकेलेल्यांना अन्न द्यावं


 अपूर्वा आज खूपच सुंदर, गोड दिसत होती. तिनं झालरीझालरीचा पांढराशुभ्र फ्रॉक, मोगऱ्याचा गजरा, गळ्यात मोत्याची माळ, पांढरे शुभ्र शूज, मोजे असं सगळं पांढरंच घातलेलं. ती धवलपरीच झाली होती अगदी. आईचं आवरेपर्यंत सगळीकडे मिरवून झाले होते. सगळ्यांनी केलेले कौतुक झेलून तिचा चेहरा आणखी फुलून गोबरा झाला होता. आईबाबा गाडीत बसले की अपूर्वाही पटकन् गाडीत बसून भुर्रकन् गेली.
 लग्नात शांतपणे लगबग चालली होती. मुली तर सारख्या इकडून तिकडे फिरत होत्या. नवी कपडे घालून मिरवत होत्या. फॅशन शो असल्यासारखं वाटत होतं. सनईचे सूर कानाला गोड वाटत होते. गुलाबपाण्याचे फवारे उडत होते. सगळं कसं मंगलमय, सुगंधी वातावरण झालं होतं. नवरा-नवरी वरती व्यासपीठावर जाऊन समोरासमोर उभा राहिल्यावर भटजींनी मधोमध अंतरपाट धरला. मंगलाष्टका सुरू होताच सगळी कुजबुज संपली. 'शुभ मंगल सावधान' असं भटजींनी म्हणताच सर्वांनी नवरा-नवरीच्या दिशेने अक्षता टाकल्या. त्यातील काही अक्षता अपूर्वाच्या अंगावरही पडल्या. तिला मजाच वाटली. लग्न लागल्यावर माईकवरून कोणी तरी सूचना दिली.
 " जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये. "
 जेवणाच्या हॉलमधे सगळेच पळाले. नवरीचे वडील सगळ्यांना आग्रहाने वाढत होते. अपूर्वा, तिचे आईबाबा पोटभर जेवले. जेवण छानच होते. बेसीनकडे हात धुवायला जाताना अपूर्वाला वेगळेच

सफर मंगळावरची । ४५