पान:सफर मंगळावरची.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "मला न्हाय बाई येत.” सुमा लाजून म्हणाली.
 "मी शिकवते ना.” आईनं तिचा हात हातात घेऊन गिरवू लागली.
 "असं गिरवायचं." ज्या हातात सतत खरकटी भांडी अन् धुण्याचं पिळंच असत, अशा ओबडधोबड हातात आज पाटीपेन्सिल होती. ईश्वरी सुमाचं गिरवणं नवलानं न्याहळत होती. 'आसं नाय, आस्संऽ' अशा सूचना देत होती. ईश्वरीच्या आईनं ईश्वरीला अ, आ, इ, ई, काढून दिलं न् गिरवायला सांगितलं. ईश्वरी पटापटा शिकून सुमालाही शिकवू लागली. पण सुमाच्या फारसं डोक्यात शिरायचं नाही. सुरवातीला बाराखडी शिकवेपर्यंत सुमाने खूप ताप दिला. ईश्वरीची आई कंटाळून जायची. सुमा तर नकोच म्हणायची. काय करायचंय, किती शिकलं तरी भांडीच घासायचीयेत. पण ईश्वरीची आई तिच्या मागंच लागली. नेटाने शिकवू लागली. बाराखडी शिकल्यानंतर सुमा छोटी छोटी वाक्य वाचू लागली. वर्तमान पत्रातली ठळक अक्षरे वाचता येऊ लागली. वर्तमानपत्रातील फोटोखालील मजकूर वाचताना तिला फार आनंद व्हायचा. ईश्वरी शिकण्यात तिच्यापुढे जायची अन् तिला शिकवायची. थोडसं चुकलं तर हळूच हातावर छडी मारायची. मग दोघीही खो खो हसायच्या. ईश्वरीची आई अधून मधून बघायची प्रगती कुठवर आलीय ते.
 एके दिवशी सुमाची आई पेढे घेऊन आली. ईश्वरीच्या आईला पेढे देत

सफर मंगळावरची । ४३