पान:सफर मंगळावरची.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 गोंधळ मुलांचा.
 "हं काकी, चालवा की, फिरवा अॅक्सीलेटर, सोप्पं तर आहे. "
 नुसता गलका. दुपारी विश्रांती घेणारे गॅलरीतून, खिडक्यातून डोकावू लागले. त्यामुळे काकी म्हणाल्या,
 "आज राहू देत. उद्या जरा भीती कमी झाल्यावर शिकते." काकींनी स्कुटी गाडीघरात नेऊन लावायाला सांगितली. मग दुसऱ्या दिवसापासून काकी नुसतं स्कुटी स्टँडला लावून गाडी चालू करायच्या. ब्रेक दाबून धरायच्या. गाडीवर बसायची भीती तरी त्यामुळे दोनतीन दिवसात कमी झाली. काकींचं ते वेड बघून, काकांनी रात्रीच्या वेळी मैदानावर कोणी नसताना काकींच्या मागे बसून काकींना गाडी शिकवली. दिवसभर काका घरी नसायचे. रात्री यायचे. मग रात्रीचं जेवण झाल्यावर दोघं स्कुटी घेऊन मैदानावर जायचे. काका मागे असल्यामुळे काकींना पुष्कळ धीर यायचा. दोन दिवसात काकी गाडी शिकल्या. तिसऱ्या दिवशी काकींनी एकट्याने गाडी चालवली. काकींना लय भारी वाटू लागलं. त्यांना स्वप्नं सुद्धा गाडी चालवतानाची पडू लागली.

 एकदा दुपारच्या वेळी मैदानावर कोण नाहीसं बघून काकी गाडी घेऊन गेल्या. काकींना चांगलाच आत्मविश्वास आलेला. दण्णाट गाडी पळवू लागल्या. अगदी चाळीसच्या वेगाने. परवा गाडी सुरू करायलाही घाबरणाऱ्या त्या ह्याच का काकी ? बघणाऱ्याला खरंही वाटणार नाही, अशी झकास गाडी पळवू लागल्या. मैदानावर दगडंही भरपूर होती. काकी मनात म्हणाल्या, दगडं, खड्डे यांनाच रस्त्यावरची माणसं, अडथळे वगैरे समजुया. त्यांना चुकवत गाडी चालवता यायला हवी. तर अशीच वेगाने गाडी चालवताना मोठा दगड समोर दिसला. त्या दगडाच्या उजवीकडून घ्यावी का डावीकडून घ्यावी, हा निर्णय काही लवकर काकींना घेता येईना. शेवटी गाडीनेच मधला निर्णय घेतला, आणि गाडी दगडावरून पळाली. पण तो निर्णय गाडीला काही पचला नाही. चांगलाच महागात पडला. तिने काकींना जोरात आपटवलं. काकींचं डोकं दाणकन् आपटलं. नंतर गाडी काकींच्या अंगावर आपटली. गाडीचा पुढचा भाग (बॉनेट) तुटला. पण आश्चर्य म्हणजे काकींचं अंग सुजणं आणि खरचटणं यापलीकडं फारसं काही झालं नाही. दोन वेदनाशामक गोळ्या गिळल्या न् मलम लावले. आठ दिवसात काकी पुन्हा हिंडूफिरू लागल्या. सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.

४० /सफर मंगळावरची