पान:सफर मंगळावरची.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "नावं ठेवतील ना मुलं." बींना रडवेली झाली. आतापर्यंत तिनं तिचे स्वत:चे, दुसऱ्यांचे असे बरेच वाढदिवस बघितले होते. पण अशा पुड्या कधीच कुणी दिल्या नाहीत. आता जर आपल्या मित्रमैत्रिणींना ह्या अशा पुड्या दिल्या तर हसतील सगळे. चिडवतील आपल्याला असं तिला वाटू लागलं.
 "तुझ्या मित्रमैत्रिणीसाठी नाहीत काय त्या पुड्या."
 "मग कुणासाठी ?"
 "आवर लवकर, चल, उद्या कळेल तुला."
 आईनं असं सांगितल्यावर बीनाला बरं वाटलं. पण मग कुणाला देणार असेल आई त्या पुड्या ? हा प्रश्न तिच्या मनात सतत घोळत राहिला. आईला विचारावं तर ती चिडेल, म्हणून ती पुन्हा काही न विचारता झोपून गेली.
 सकाळीच नेहमीप्रमाणे भिकाऱ्यांच्या मुलांची हाक ऐकू आली.
 "माय, वाढा वो ऽ"
 कॉलनीच्या कोपऱ्यावर दहा-बारा मुलं अन् त्यांच्या आया यायच्या. शिळंपाकं कुणी कुणी त्यांना वाढायचे.
 बीना अजून अंथरूणातच गाढ झोपलेली होती. आईनं तिच्या केसातून हात फिरवत तिला जागं केलं. तिची पापी घेत म्हणाली,
 "हॅपी बर्थ डे टू यू."
 बीना खूश झाली. वाढदिवसाच्या आठवणीनं ती एकदम उठून बसली. "चल माझं एक काम कर." आई तिला म्हणाली. बीनाला वाटलं, आज आपला वाढदिवस असून, लाड करायचं सोडून असं उठल्या उठल्या आई काम काय सांगत्येय. तरी ती आईच्या मागं गेली. आईनं कालची पुड्यांची पिशवी तिच्या हातात देत म्हणाली,
 "ह्या पुड्या त्या भिकाऱ्यांना देऊन ये."
 बीनां सगळं समजली. ती पिशवी घेऊन बाहेर गेली. तिनं सगळ्यांना पुड्या दिल्या. उरलेल्या पुड्या मुलांना पुन्हा एकेकदा दिल्या. खिडकीतून आई डोळे भरून तिच्याकडे बघत होती. बीनाचा वाढदिवस असा तिच्या वाढत्या मोठ्या विचारांनी व्हायला हवा. वयाबरोबर विचारांचीही वाढ व्हायला हवी. वाढणाऱ्या विचारांचा वाढदिवसच खरा वाढदिवस होय.

***
३८