पान:सफर मंगळावरची.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाढदिवस


 बीनाचा वाढदिवस होता म्हणून बीनाच्याच पसंतीचा फ्रॉक आणला. क्रिम कलरच्या बलून फ्रॉकवर बॉटलग्रीन कोट बीनाला शोभून दिसत होता. तिला वाढदिवसाशिवाय काहीच सूचत नव्हते. कुणाकुणाला बोलवायचे, काय काय करायचे असेच सारखे विचार यायचे तिच्या मनात. आईच्या मागेपुढे लुडबुड करत ती आईला वैताग आणत होती.
 “आई काय करत्येयस?" गॅसवरचं भलं मोठं पातेलं बघून बीनानं आश्चर्यानं विचारलं.
 "चिवडा."
 "एवढा 55?" मोठे मोठे डोळे करत बीना ओरडली.
 "हो! तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना पोटभर खायला नको का." चिवडा हलवून थोडासा तिच्या हातावर टेकवला, अन् आई म्हणाली,
 "खेळ जा."
 गरम चिवडा ह्या हातावरून त्या हातावर घेत, फुंकर मारत चारपाच दाणे तोंडात टाकत. बीना म्हणाली,
 "आई, केक पण मोठाच कर. मी खूप खाणारेय."
 "बरं बाई." बीना खेळायला गेली. आईनं लाडूसाठी रवा भाजायला घेतला. रवा भाजल्यावर पाकात टाकला. रव्यात पाक चांगला मुरल्यावर लाडू वळून डब्यात भरून ठेवले. उद्या बीनाचे मामा, मामी, रोहित हा मामेभाऊ येणारेत. घरात पाहुणे आल्यावर जास्तीची कामं होत नाहीत. म्हणून केकही आजच करायला हवा. अजून खूप कामं पडलीयेत. पण थकवा आल्यामुळे बीनाची आई जरा खाटेवर आडवी झाली. थोडा आराम केल्यामुळे तिला हुशारी वाटू लागली. मग उठून तिनं तोंड धुतलं. केक ओव्हनला लावून ती वर्तमानपत्राचे तुकडे करू लागली. तेवढ्यात बीना आलीच. मग बिनालाही मदत करायला घेतलं. कागदाच्या तुकड्यावर लाडू - चिवडा-चॉकलेट असं घेऊन पुड्या बांधू लागली. वीसपंचवीस पुड्या बांधून पिशवीत भरताना बीनाने विचारले,
 "आई, मुलांना अशाच पुड्या द्यायच्या?"

 “हो."

सफर मंगळावरची । ३७