पान:सफर मंगळावरची.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काहीवेळानं आकी मालकिणीकडनं निरोप घेऊन आली ती म्हणाली,
 “आयं, इद्या दुपारीच गेली. तिजं वडील आल्त्यं न्यायला. हा म्हनलं तरी हायलं न्हायत."
 “आता गं मग?"
 “मी बोलता बोलता काकीन्ला म्हनलं, कांचीनं अंगाला येतुया का म्हणून शीटर घातला तर काढीनाच. तिला दिसत बी हुता लई चांगला." मालकीणीला सगळी मुलं काकीच म्हणायची. तर काकी म्हणाल्या, “आंग, रांडच्यानो, घालून बी बगितला का? मग ठेव आता कांचीलाच. न्हायतर आता आमच्यात तरी कोण हाय घालायला."
 "मंग?" आईनं उत्सुकतेने विचारलं.
 "मग काय कांचीलाच दिला त्यांनी शीटर." असं म्हणत आकीनं आईकडं पिशवी दिली.
 “काकी लय चांगल्या हाईत." कांचीची आई म्हणाली.
 “काकी म्हनल्या, पगारातनं फेड म्हणावं जमंल तसं पैसं. "
 आकीनं तसं सांगितल्यावर आईचा थोडा हिरमोड झाला. तिला वाटलं तसाच दिला की काय पण... जाऊंदी न्हायतर फुकटचं कुणाला काय पचतं? फेडायला येत्यालं थोडं थोडं पैसं. आईनं शहाण्यासारख्या विचार केला.
 "घ्या राणीसाब तुमचं सगळीच लाड करत्याती. आमाला कोण काय देत न्हाय." लटक्या रुसव्यानं आकी म्हणाली.
 “आके, तूच घाल की मग." कांचन समजुतीनं म्हणाली.
 "मला बसल व्हय ?"
 "बसल की, बघ तरी घालून" आई म्हणाली.
 आकीनं मऊ मऊ स्वेटर अलगद हातावर चढवला. थोडासा आवळत होता. पण बसला अंगात.
 "आता दुघींनीबी आल्टुन पाल्टुन घाला, भांडू नगा." आई म्हणाली
 "आय, पुढच्या येळंला तुला न् बापूला आणू शीटर. सुट्टीत आमी पण येतू कामाला." कांचन म्हणाली.
 "व्हय गं माझी गुणाची बाय" आईनं कांचनला जवळ घेतलं. कांचन आणि आई या दोघींना एकमेकींच्या मायेची उब मिळत होती. आकीच्या अंगात स्वेटर खुलत होता.

***
३६। सफर मंगळावरची