पान:सफर मंगळावरची.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

"असू दी गS पोरीची जातय, म्याच म्हणलं अंगाला येतुला का बघ, म्हणून तिनं घातला."
कांचननं अंगातून स्वेटर काढून अलगद आईच्या हातात दिला. तिनं आईला विचारलं.
 "आयं, कुणाचा हाय गं?"
 "आसल कुणाचा तरी, तुला कशाला पायजेत पंचाती?" आकी म्हणाली.
 "अगं, आपल्या त्या मालकिणीची भाची कोण गं ती ?"
 "इद्या व्हय ?"
 “हो, हो. मालकिणीनं माझ्याजवळ पैसं दिलं न् म्हणाली, तुमी आठवडी बाजाराला जाताय तर, इद्याला कांचीच्या मापाचा शीटर आणा. इद्या म्हणाली वाटतं, मला कपडे, डिरेस नगं आत्या, शीटरच आण. म्हणूनशानं मालकिणीनं शीटरला गपचिप पैसं दिलं. मालकाला बी म्हाईत न्हाय."
 "आयं मला पण का गं आणला न्हाइस असला शीटर ? किती मऊ मऊ हाय."
 "येडी का काय गं, आपल्याजवळ कुठलं एवढं पैसं ?"
 बापू कपबशी आईकडं सरकवत म्हणालं. कांचन हिरमसून गप्प बसली.
 "म्या म्हणत हुती तुझ्या बापूला. कांचीला पण घ्या एक शीटर." आई कुरकुरली.
 "कावो बापू, मला शीटर घेतला न्हाय ?"
 “म्होरच्या येळंला गेलू ना की आणतू बघ दुर्घींन्लाबी. "
 "तवर थंडी संपायची. "
 "आपून गरीब मान्सं, थोडी कळ काढाया लागतीया. गरीबाला थंडी तरी कुठं वाजती ! एका जागी बसणाराला वाजती थंडी, आपल्या- सारख्या कामं करणाराला न्हाय वाजत." असं म्हणून बापू उठून गेलं. आकीनं स्वेटरची व्यवस्थित घडी करून पिशवीत ठेवली.
 "दिऊन ये जा मालकिणीकडं, मालक यायच्या आत."

 स्वेटर घेऊन आकी गेली. कांचन हिरमुडून गेली. गालावरचं लालजर्द गुलाबाचं फूल कोमेजलं अन् डोळ्यांत उतरलं. ती तशीच बसून राहिली.

सफर मंगळावरची । ३५