पान:सफर मंगळावरची.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लाल स्वेटर


 कांचन आज खूप खूश होती. नुसती इकडून तिकडे बागडत होती. तिची ही गंमत नानू मघापासून बघत होता. त्याला वाटलं, 'हिनं नवा शीटर घातलाय म्हणून एवढ्या उड्या मारतीया तर'
 "ए ऽऽ कांचे, थंडी नाय तरी शीटर घातलायस."
 नानू तिला चिडवत म्हणाला.
 "तुला काय करायचंय ?
 असं म्हणत कांचन पुन्हा इकडं तिकडं बागडू लागली. तेवढ्यात संतू आला.
 "संत्या, बघ की कांचीनं नवा शीटर घातलाय म्हणून कशी मिरवतिया,” नानू म्हणाला.
 "लेका भारीच हाय की, शीटर बघू कांचे."
 संत्या तिच्याजवळ जात म्हणाला.
 "केवढ्याचा गं?"
 "मला न्हाय म्हायत, आयंन घालून बघ म्हनली म्हणून घातला. आताच आलीया बाजारालं."
 "तुझ्या आकीला पण आन्ला ?'
 "न्हाय, मला एकटीलाच आन्लाय." कांचन म्हणाली.
 तेवढ्यात कांचनची थोरली बहिण आली. तिला हात पकडून म्हणाली,
 "हिथं खेळत बसलीस व्हय, तिकडं म्या किती हुडकली ?"
 असं म्हणत तिला हाताला धरून ओढत नेली. कांचनचे आईवडील चहा पीत बसलेले.
 आकी कांचीला ओढत आणताना दिसली.
 "आगं आगं तिला वढू नगंस." कांचीची आई कळवळून म्हणाली.
 "पोरगी कशी गुलाबाच्या फुलावाणी दिसतिया. लाललाल शीटर लयच बेस दिसतुया."
 तिला जवळ घेत आई कौतुकानं म्हणाली. तसं आकी कडाडली.

 "कांचे, काढ शीटर. तुझा न्हाय. लगीच घालून गेली मिरवायला. "

३४