पान:सफर मंगळावरची.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कधी मारत नाही. नेहमी म्हणते, सतत काम करणारा एवढासा जीव. अन्न मिळवणं हा त्यांचाही हक्क आहेच ना. जागा बदलली की, त्यांना धोक्याची जाणीव होते अन् त्या निघून जातात. दप्तराची थोड्याथोड्या वेळाने जागा बदलायची म्हणजे झालं. पीठ भुरभुलं तरी जातात. आईने दीप्तीकडे बघितले तर तिचे डोळे रडवेले. तिचा छोटासा नाजूक हात चांगलाच सुजला होता. आईचं लक्ष गेल्यावर ती आणखीनच मुसमुसायला लागली. तेव्हा आईनं विचारलं,
 "फार दुखतंय का?"
 "दुखत नाही. खाजवून सुजलंय. डॉक्टरकडे नेणार नाहीस ना?"
 "नाही गं, मुंग्या चावल्यावर कुठे डॉक्टरकडे जायचं असतं ?"
 आता दीप्ती शांत झाली.
 "दीपे, आता तरी आठवणीनं कामं नीट करत जा. आतापासून अशी स्वतःची कामे स्वतः करायची सवय लावावी. लहानपणी मेंदूची पाटी कोरी असते. त्यामुळे शिकलेलं आयुष्यभर लक्षात राहातं. म्हणून चांगलं ते जास्तीत जास्त शिकावं. मग मोठेपणी काही त्रास होत नाही. आपला वेळ वाचतो. वस्तू पण जागेवर राहतात. यालाच शिस्त म्हणतात. तुझ्याएवढी असताना माझ्या सगळ्या वस्तू मी नीट जागेवर ठेवायची. शिवाय भांडी घासणं, कपडे धुणं अशी कामंसुद्धा करायची. एवढंच नाही तर मी चपात्या, भाकरीसुद्धा करायची."
 "खरे ऽ"
 "मग ! मी नेहमी खरंच बोलते. माणसानं नेहमी खरं बोलावं, खरं वागावं."
 "आई 5 " असं म्हणत दीप्ती आईला बिलगली.

***
सफर मंगळावरची । ३३