पान:सफर मंगळावरची.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पुस्तक सापडलं तर आता गृहपाठाची वही सापडेना. दिप्ती शोधताना विचार करत होती. आईला विचारावं तर ती ओरडणार. पण आईनंच दिवाणखाण्यातल्या चहाच्या मेजावरची वही तिच्याकडे दिली. दीप्ती ओशाळं हसली. मनातल्या मनात म्हटली, आई किती चांगली आहे. शाळेत जाताना तिनं आईला लाडाने पापी दिली.
 दीप्ती शाळेतून आली. तेव्हा आई भाजी निवडत होती. दीप्तीनं खाणंपिणं उरकलं आणि तिच्याजवळ बसून गृहपाठ केला. वही पेन तिथंच ठेवून वेंधळाबाई तशाच खेळायला गेल्या. खेळून झालं की जेवून झोपली.
 शाळेत जाताना शोधाशोधीत एवढा पसारा घालायची की ती शाळेत गेल्यावर आईला तो पसारा आवरायला तासभर लागायचा. आई दीप्तीच्या कानीकपाळी ओरडायची,
 "दीपे ऽ, तुझ्या वस्तू नीट ठेवत जा. आजच्या दिवस मी आवरतेय पण उद्यापासून अजिबात आवरणार नाही. "
 असा दम दिला म्हणजे, दीप्ती पसारा उचलून ठेवायची. पण एक वस्तू सापडेल तर शपथ. एखादी वस्तू शोधताना पुन्हा सगळा पसारा.
 एका शनिवारी सकाळची शाळा म्हणून आईनं फरसाण, शेव डब्यात दिलेलं. डब्यात थोडंसं खरकटं शिल्लक राहिलेलं. दिप्तीने शाळेतून आली की दप्तर फेकलं अन् शक्तिमान बघायला टी. व्ही. पुढे बसली. नंतर कपडे बदलणं, हातपाय तोंड धुणं, जेवण. दुपारी सुट्टी म्हणून आईच्या कुशीत वामकुक्षी. संध्याकाळी गृहपाठ करावा म्हणून दीप्ती दप्तराकडे गेली. आज काय सांगितलं ते आठवत आठवत दप्तरात हात घातला. ती किंचाळतच हात झाडू लागली. आई घाबरली. तिला म्हणाली,
 "अग काय झालं?"

 दीप्ती हात झाडत नाचू लागली. आईनं कसातरी तिचा हात हातात घेऊन बघितला तर, हातावर दहाबारा तांबड्यालाल मुंग्या. हाताच्या हालचालीमुळं आणखी घट्ट रुतत होत्या. आईनं हात स्थिर ठेवला न् हलक्यानं मुंग्या झटकल्या. दीप्तीला मोकळ्या हवेत बसवलं. मग दप्तर बघितलं. आत डबा तसाच होता. खरकट्या डब्याच्या वासावर मुंग्या आलेल्या. सगळं दप्तर गच्च भरलेलं. पुस्तकात, वह्यात मुंग्याच मुंग्या. दप्तर मोकळं करून धुवायला टाकलं. वह्या पुस्तकं कंपास दाराबाहेर ठेवलं. आता मुंग्या आपोआप निघून जातील म्हणून. आई मुंग्यांना

३२ / सफर मंगळावरची