पान:सफर मंगळावरची.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 हातावर ताल कसा धरायचा. ताल म्हणजे काय, वगैरे अशा सगळ्या गोष्टी खारुताई शिकू लागली. एक ताल तयार झाला की त्याचा कायदा, तुकडा शिकवायचा. मग दुसऱ्या तालाचे बोल, टाळी मंकू तिला शिकवायचा. खारुताई प्रयत्नांची पराकाष्ठा करायची. अक्षरं बरोबर वाजवायची पण बोल हवे तसे परिणामकारक उठत नव्हते. चिंकू, गोटू तिच्या गडबडगोंधळाला फिदी फिदी हसायचे. पण खारुताई त्यांच्याकडे लक्षच द्यायची नाही. उलट सगळं वाजवता यावं म्हणून जोमाने सराव करायची. शिकताना तिला जे समाधान मिळत होते. त्याच्यापुढे दुसऱ्यांच्या हसण्याचे तिला काहीच वाटायचे नाही. खारुताई मनापासून प्रयत्न करत होती. त्यामुळे मंकूही तिला प्रोत्साहन द्यायचा. खारुताईच्या डोक्यात आता सतत 'धीं धा धीं धिनक, तीं ता तीं तिनक' असंच असे.
 एके दिवशी मंकूने बातमी आणली, तो म्हणाला.
 "आपल्या जंगलात वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. त्यात स्वतंत्र वाद्य वादनाचीही स्पर्धा आहे. मी तुम्हा सर्वांची नावे दिली आहेत."
 " अरे माझं कशाला दिलंस नाव ? आता कुठे मला बरं वाजवायला येऊ लागलंय." खारुताई म्हणाली.
 "अजून आठ दिवस वेळ आहे. तुम्ही सर्वजण खूप सराव करा. बक्षीस मिळेलच. "
 गोटू, चिकून उड्या मारून, मिठूनं पंख फडफड करून गोंधळ, मजा केली. खारुताई मात्र चितागती झाली. तिला वाटलं, सगळ्यांना खूपच चांगलं येतं वाजवायला. स्पर्धेत आपली फजिती होणार, उगाच घेतला भाग... मंकूला सांगावं भाग नकोच घ्यायला. अजून कशात काही नाही. आता कुठे तबल्यावर हात बसायला लागलाय. ती मंकूकडे गेली आणि त्याला म्हणाली,
 " मंकू, मी नाही बाबा भाग घेत. फजिती होण्यापेक्षा नुसती ऐकायला येते. मला कळेल म्हणजे नेमकं काय असतं. कशी असते स्पर्धा आणि मग पुढच्या वेळेस घेईन मी भाग."

 " तू भाग घे. त्यानिमित्ताने सराव होईल. फार तर बक्षीस मिळणार नाही. नको मिळू दे, स्पर्धेची भीती तर जाईल. तू सरावाला सुरुवात कर, वेळ घालवू नकोस." मंकून तिला समजावले. मग खारुताईने विचार केला, सराव तरी करू, काय होईल ते होईल. हरलं तरी दुःख होण्याचं काय कारण नाही. मग

सफर मंगळावरची । २९