पान:सफर मंगळावरची.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " फळं आणतात की "
 "तुझं पोट भरत असेल मग. तरीच झाडावरून उड्या मारताना दिसत नाहीस. ऐदी होशील माणसासारखा."
 " शिकवण्यातच वेळ जातो माझा. फळं कधी शोधू ? मी काय मागत नाही. तेच देतात आणून. तू पण आता बळेच नाही का फी देते म्हणालीस ? तुझं हे बरंय दोन तोंडांनी म्हांडूळासारखं बोलायचं. "
 "चुकलं बाबा माफ कर. चल शिकव मला तबला. "
 "आता राहू दे मूडच गेला माझा. उद्या सकाळी ये."
 "ये रागावू नकोस. रोज आयती फळं मिळाली तर उड्याच मारायचा विसरणार नाहीस का तू, म्हणून मी तसं म्हटलं. व्यायाम न करता आयतं बसून खाल्लं तर आजारी पडणार नाहीस का?"
 “तू तर ना असा डोक्याला ताप देतेस बघ. माझं अन्न मी शोधून खाईन."
 ठरल्याप्रमाणे खारुताई, चिंकू, मिठू, गोटू, हे मंकूकडे सकाळची न्याहरी आटोपून शिकायला यायचे. उन्हं उतरली की, सगळेजण पुन्हा आपले अन्न शोधायला बाहेर पडत.
 खारुताईचे हात तयार व्हायलाच दोन तीन दिवस गेले. ठराविक कोनात हात ठेवून फक्त बोटांनी वाजवणं फारच अवघड गोष्ट. तिला तर हातही नीट ठेवता येईना. हात व्यवस्थित ठेवला तर, तबल्यातून आवाजच निघायचा नाही. पण सरावाने शिकली खारुताई. आधी आवाजच येत नव्हता, आता जरा जरा आवाज निघू लागला. मंकून पहिल्यांदा दादरा तालाच्या मात्रा सांगितल्या. मग ते बोल कसे वाजवायचे ते शिकवले.
 'धा धी ना,
 धा ती ना,
 हे बोल तिनं आधी पाठ केलं. नंतर तबल्यावर वाजवू लागली. हळूहळू प्रगती होऊ लागली. खारुताईचा दिवस आता पटकन संपायचा. ती बसेल तिथं. जमिनीवर, झाडाच्या फांदीवर तबल्यातील बोल वाजवू लागली. बोल जरी नीट वाजत नसले तरी चुकत नव्हते. एकच ताल वाजवायचा तिला कंटाळा येऊ लागला. मंकूने मग झपताल तिला शिकवला.
 'धी ना धी धी ना

 ती ना धी धीना'

२८ । सफर मंगळावरची