पान:सफर मंगळावरची.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ती रात्रदिवस तबल्याचाच विचार करू लागली. तबला वाजवायचा कंटाळा आला की, हाताने ताल धरायची. तिच्या या वेडाला सगळे हसायचे. पण ती कशाकडेच लक्ष द्यायची नाही. चिकू, गोटू मात्र बिनधास्त होते. त्यांना वाटायचं आपल्याला चांगलं येतं वाजवायला तर कशाला काळजी करायची ? तिघांना वाटायचं आपणच बक्षीस मिळवू. मंकूने किती सांगितलं तरी ते लक्षच द्यायचे नाहीत.
 स्पर्धेचा दिवस उजाडला. स्पर्धकांना आधी क्रमाने वाद्य वाजवायला सांगितलं. नंतर त्यांना एकच ताल एकदम सर्वांनी मिळून वाजवायला सांगितला. त्रिताल वाजवताना चिकूचा ठोका चुकला. त्याला बाहेर काढण्यात आलं. अंतिम फेरीत खारुताईनं अतिशय तन्मयतेनं तबल्यावर तिहाई वाजविली. तिच्या वादनात बराच गोडवा होता. तिला तिसरं बक्षिस मिळालं तर गोटूला दुसरं. पहिलं बक्षिस दुसऱ्याच कुणाला तरी मिळालं. मंकू थोडा नाराजच झाला. खारुताईने उशिरा येऊन बक्षिस मिळवलं अन् एवढा हुशार चिकू बाहेरच काढला गेला. खारुताई किती सहजतेनं वाजवत होती. मंकूनं तिचं फारच कौतुक केलं. चिकूला न् मिठूला चांगलंच झापलं. पुढच्या वर्षी मात्र सगळ्यांनी झटून तयारी करायची ठरवलं. खारुताईनं मनापासून प्रयत्न केलं. मनचे मांडे खात बसण्यापेक्षा तिनं मेहनतीला महत्त्व दिले. चिकू, मिठूला मात्र फाजील आत्मविश्वास नडला. यश मिळवायचं असेल तर सराव हवाच. जेवढा सराव जास्त, तेवढं तुम्ही यशाच्या जवळ जाल. यश आपल्या हातात येण्यासाठी सरावाला पर्याय नाही.

३० सफर मंगळावरची