पान:सफर मंगळावरची.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खारूताईचं तबलावादन


 एक होती खारूताई. सारखी इकडून तिकडे सरसर फिरे. फिरून फिरून कंटाळा आला की, झाडावर बसे. तेव्हा ती विचार करीत असे. तिला वाटे, काय हे आपले आयुष्य सारखं सरसर झाडावर, झरझर खाली. काही शोधायचं. खायचं की झालं. कंटाळा आलाय असल्या आयुष्याचा. काहीतरी वेगळं केलं पाहिजे... पण काय केलं म्हणजे बरं वाटेल? असा ती सारखा विचार करू लागली.
 एके दिवशी एका बंगल्याच्या बाहेर फिरत असताना, तिला भरपूर खाऊ मिळाला. खाऊ खाताखाता खारूताईचं लक्ष आतील आवाजाकडे गेले. खारूताईने खिडकीतून डोकावून पाहिले. तर तिथे मंकू ( माकड ) तबला वाजवत बसलेला. खारूताईला फारच आश्चर्य वाटलं. या मंकूला एवढा चांगला तबला कसा काय वाजवायला येतो? हूंऽ तरी हल्ली हा मंक्या कोणाच्या खोड्या काढत नाही. या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत नाही. त्याचे रहस्य हे आहे तर! मंकू तबला मात्र सुंदर वाजवत होता. कानाला गोड वाटत होतं. खारुताई मग रोज त्याचं तबलावादन ऐकण्यासाठी खिडकीत येऊन बसू लागली. बंगला जुना मोडकळीला आलेला. तिथं माणसं कुणी राहातच नव्हती. त्यामुळे सगळे पक्षी, प्राणी तिथं येऊ शकत होते. खारुताई तर आधीच धिटुकली, त्यात मंकूच्या ओळखीची. मग काय ती त्याच्या समोरच येऊन बसू लागली, खारुताईंचा वेळ छान जाऊ लागला. एकदा मंकू खारुताईला म्हणाला,
 " तू का नाही तबला वाजवायला शिकत ?"
 "अरे, मंक्या मला रे कसा येईल, तबला वाजवायला ?"
 "शिकलं की सगळं येतं."
 "छे रे बाबा, उगीच काय, प्राणी जग नावं ठेवील."
 "नावं ठेवायचा काय संबंध? ही काय माणसं आहेत का, नावं ठेवायला ? आपल्या प्राणी जगात कोणी कोणाला नावं ठेवत नाहीत. सगळे आपल्याला हवं तसं जगतात. चल ये बघू. मी सांगतो तुला कसं वाजवायचं ते."

 "नको बाबा, मलाच घाबरायला होतं. जमतंय की नाय...."

२६ । सफर मंगळावरची