पान:सफर मंगळावरची.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिकडं बघितलं. कावकाव करत आपल्या मित्राला हाक मारली. पण सगळीकडं शांतातच होती. कुठं गेला असेल ? या विचाराने तो बाहेर आला तर झाडाच्या बुंध्यात रासायनिक पदार्थांची घाण पडलेली, त्यातच काळपट बगळा पडलेला. आधी तर ओळखायलाच आला नाही, पण कावळ्याने नीट निरखून बघितलं तर तो आपला मित्रच आहे. त्याने कावकाव करत त्याला हाक मारली, पण बगळ्याचा जीव केव्हाच निघून गेला होता. कावळा दु:खाने कावकाव ओरडू लागला. त्याला अतिशय वाईट वाटले. मरण्याआधी त्याने आपले पांढरे झालेले पंख तरी बघायला हवे होते. आपण आधी बगळ्याला पंख दाखवून मगच औषध आणायला जायला हवं होतं. असा कसा आपल्याला सोडून गेला? कावळा सैरभैर झाला. कावकाव करीत गावभर ओरडत फिरू लागला.
 पांढरा शुभ्र पक्षी कावकाव कसा काय करतोय ? म्हणून माणसं बघू लागली तर हा कावळ्याच्याच आकाराचा पक्षी, कावळ्यासारखाच दिसतोय. अन् कावकाव करतोय. माणसानं नीट न्याहाळलं तर तो कावळाच होता. माणसाला पांढराशुभ्र कावळा बघून खूप आनंद झाला. त्याने कावळ्याला पकडून मोठ्या पक्षीसंग्रहालयात ठेवलं. कावळ्याला खूप पश्चात्ताप झाला. पांढऱ्या गोऱ्या रंगापायी कावळ्याने चांगला मित्र आणि स्वतः चे स्वातंत्र्य गमावलं होतं.

सफर मंगळावरची । २५