पान:सफर मंगळावरची.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "बरं. वडाच्या ढोलीत आपण प्रयोग करू.' बगळा म्हणाला.
 कावळा काहीबाही उचलून आणायचा माणसाच्या वस्तीतून. बगळा त्यांच्यावर प्रयोग करायचा. पानांच्या द्रोणातून मिश्रण कालवून ठेवायचा. कावळा आला की, पंखाच्या थोड्या भागावर लावायचा. थोडा वेळ ठेवून धुवायचा. कावळ्यानं आणलेलं उष्टं खरकटं खाऊन प्रयोग करत राहायचा. कावळा मोकळा फिरत राहिल्यामुळे निरोगी राहिला. बगळा मात्र दिवसेंदिवस खंगत चालला. सतत प्रयोग करत राहिल्यामुळे त्याला मासे पकडून खायला वेळ मिळेना. आपल्या मित्रासाठी आपण औषध, लेप तयार करूच. असा त्याने निश्चय केला. स्वत:च्या खाण्यापिण्याकडे लक्ष देईना. कावळा काही आणून द्यायचा पण बगळा खायचाच नाही. कावळ्याचं ऐकायचा नाही.
 एकदा त्यानं पांडुरकं मिश्रण तयार करून कावळ्याच्या सगळ्या पंखांना लावलं. खोकत खोकत लावलं.
 "बगळ्या, तुझा खोकला फारच वाढलाय. मी पटकन औषध घेऊन येतो." कावळा म्हणाला. “नको, नको असा लेप लावून उन्हातान्हात फिरू नकोस. तासाभरानं आंघोळ करूनच जा." असं म्हणून बगळा तिथंच पडून राहिला. तासाभरानं कावळा नदीत आंघोळ करायला गेला. जसजसा लेप धुवून जाईल तसतसा पंखांचा रंग शुभ्र उजळून निघू लागला. कावळ्याला अत्यानंद झाला. त्याला बगळ्याबद्दल खूप कृतज्ञता वाटली. आधी त्याला औषध आणि काहीतरी छानसं खायला आणून मगच त्याच्याकडं जाऊयात. असा विचार करत कावळा माणसाच्या वस्तीत गेला. इकडं बगळ्याला खोकल्यानं बेजार केलं. म्हणून तो ढोलीतून खाली उतरला. उडायला पंखात शक्तीच नव्हती. झाडाच्या बुंध्याशेजारी प्रयोगाच्या पदार्थांची घाण पडलेली. त्या साचलेल्या घाणीतून कसाबसा बाजूला बसला. खोकून, खोकून जीव हैराण झालेला. त्याला पाणी हवं होतं. पण नदीपर्यंत जाण्याएवढं त्राण नव्हतं. कावळा कसा येईना त्याला लावलेल्या लेपाचं काय झालं असावं? काहीच कळेना. बगळा पाण्यावाचून तडफडत राहिला. घाणीत पडल्यामुळं त्यांचे पंख काळे पडले. अंगाची आग होऊ लागली. घशाला कोरड पडली. पाण्याशिवाय त्याचा जीव निघून गेला.

 कावळा बगळ्यासाठी शोधून शोधून औषध आणि खाणं घेऊन आला. कावळ्याला वाटलं बगळा आता आपल्याला ओळखणारच नाही. त्याची गंमत करायची. गुपचूप ढोलीत गेला. तर तिथं बगळा नव्हताच. कावळ्यानं इकडं

२४