पान:सफर मंगळावरची.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एक शब्द कौतुकाचा


 हृषीकेशला जिमखाना कोचिंग क्लासमध्ये घातलेले. बामणे सर जीव तोडून सराव करून घ्यायचे. पहिल्याच रविवारी जास्त वेळ सराव घेतला. हृषीकेशचे अंग एवढे दुखायला लागले की बस, श्वास घेताना छातीच्या फासळ्या दुखू लागल्या. कणकणी, बारीक ताप यामुळे शाळा बुडवून झोपून राहिला. दुसऱ्या दिवशी बरं वाटल्यावर शाळेत जाऊ लागला आणि क्रिकेटच्या सरावालाही तसाच. एकदा लंगडतच आला. घाबरतच आईने विचारले, "काय झाले रे"
 "गुडघ्याला चेंडू लागला." हृषीकेश विव्हळत म्हणाला.
 "मग एवढं काय होतंय ?" ऋतुजा म्हणाली.
 "तुला काय माहित क्रिकेटचा चेंडू कसला दगडासारखा असतोय. अया ई S" करत हृषी म्हणाला.
 "गरम पाणी ओत जरा गुडघ्यावर, आंघोळ करताना. म्हणजे बरं वाटेल." आईनं सांगितल. हृषीकेशने सांगितल्याप्रमाणे केलं. तरी बरं वाटेना. गुडघा दुखतच होता.
"आई शाळेत कसं गं जाऊ?"
 "बरं राहू दे आजच्या दिवस." आईची परवागनी मिळाली. "पण घरात त्या त्या विषयांच्या तासांचा अभ्यास कर."
 चालता फिरता येत नव्हतं, त्यामुळे त्यानं दिवसभर अभ्यास केला. गुडघ्याला आराम पडला की पुन्हा शाळा सुरू झालीच पण क्रिकेटचा सरावदेखील सुरूच राहिला. सकाळी लवकर उठून दिगूच्या घरी जायचा. दिगूचं घर मैदानापासून जवळ होते. त्याच्याकडे सायकल ठेवून दोघं चालत मैदानावर जायचे. सराव करून घरी आले की शाळेत जायची तयारी करत करत क्रिकेटच्याच गप्पा करत. असा क्रिकेटमय झालेला हृषीकेश.
 एके दिवशी, पुन्हा एकदा बोटाला दुखापत घेऊनच हृषीकेश घरी आला. झेल घेताना मधल्या बोटाला मार लागलेला. हृषीकेश रडतच घरात आला. लागल्यापासून घरी येईपर्यंत कसेबसे आवरून धरलेले अश्रू डोळ्यावाटे पाझरू लागले.

 "अरे, असंच असतं. आमचा हॉकीचा सराव चालायचा तेव्हा तर आम्हाला

सफर मंगळावरची । १९