पान:सफर मंगळावरची.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "मला मात्र भाकरी कालवणच कर." बाबा म्हणाले.
 "हो, ठेचा पण करते. एवढ्या वर्षांनी टिपूर चांदणं पडणार तर त्याची मजा सगळ्यांनी मिळून घेऊ या.'
 “किती दिवसांनी हो बाबा असा चंद्र जवळ आलाय." ऋतुजा म्हणाली.
 "तब्बल एकशे तेहतीस वर्षांनी हा योग आलाय." बाबांनी सांगितले.
 "हो ?" ऋतुजा ओठांचा चंबू करून ओरडली.
 "मग तर उद्या गच्चीवर येण्याची संधी अजिबात सोडायची नाही. "
 भांड्यांची आवराआवर करत आई म्हणाली.
 ऋतुजा आणि हृषीकेश यांनी आपल्या मित्रमंडळींना आणि त्यांच्या आईबाबांना गच्चीवर जेवायला बोलावले. बऱ्याच जणांकडे गच्ची होती तरी, एकत्र जेवणाचा आनंद, तोही अपूर्व अशा तेजस्वी चांदण्यात लुटायचे ठरविले. त्या दोघांनी शाळेतल्या सोबत्यांना देखील तेजस्वी चांदण्याची गोष्ट सांगितली.
 मार्गशीर्ष पौर्णिमेला ऋतुजा, हृषीकेशच्या गच्चीवर सगळे जेवायला जमले. पण आभाळ ढगांनी गच्च भरून आलेले. लाईट लावूनच जेवावे लागले. खूप मजा आली पावसाळा सोडून दर पौर्णिमेच्या जवळच्या रविवारी. कुणाच्या तरी गच्चीवर जेवायचं. असं सगळे जण बोलत होते. कुणी कविता ऐकवत होते. पण आभाळ मोकळे होण्याचे काही चिन्ह दिसेना.
 “हे काय पावसाळ्याचे दिवस आहेत का? आपलंच दुर्भाग्य म्हणायचं न् काय !" असे म्हणत सगळे हळहळत गच्चीवरून उतरले.
 दुसऱ्या दिवशी पहाटे ऋतुजाचा शिकवणीचा वर्ग असल्यामुळे ती लवकर उठलेली. हृषीकेशला क्रिकेट क्लबला लवकर जायचं असल्यामुळे तोही उठलेला. ऋतुजाने पश्चिमेकडील खिडकी उघडली तर तिला भले मोठ्ठे चंद्रबिंब दिसले. तेजस्वी चंद्रबिंब ! तिने आईबाबांना गच्चीवर चलण्याची घाई केली. पहाटेची थंड हवा. निरभ्र आकाश न् मावळतीकडील भले मोठे तेजस्वी चंद्रबिंब. भान हरपून पाहाताना सर्वांची थंडी पळाली. निसर्गाचा चमत्कार पाहाताना मन भरून आले होते.
 "सरत्या सहस्त्रकातील शेवटचे तेजस्वी चंद्रबिंब ! आणि आपल्या आयुष्यातीलही !" बाबा पुटपुटले.

***
१८