पान:सफर मंगळावरची.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हलायला यायचं नाही." बाबा सांगू लागले. “बघ माझ्या कपाळावर अजून व्रण आहे हॉकीस्टिकचा. आमचे तर सैनिक स्कूल. कडक शिस्तीत सराव सुरू असायचा. मी कॅप्टन होतो आमच्या टीमचा हॉकीस्टीकचा मार खाल्लाय न् दिलाय पण."
 तरी त्याचा हुंदका कमी होईना. आई सकाळच्या कामाच्या गडबडीत होती. तिनं त्याच्या बोटाला लागलंय एवढंच ऐकलेलं. बाबा ऑफीसला गेले. हृषीकेश आईला म्हणाला, "आई, पेन हातात धरलं तरी दुखतंय. नुसता धक्का लागला तरी दुखतय, शाळेत जाऊन काय करू? "
 आई वैतागून गेली. त्याला म्हणाली. “तुझं जर रोज असंच चाललं तर क्रिकेट कोचिंग बंद कर बघू. सारखी काय शाळा बुडवतोस ? जसा काय सचिन तेंडुलकरच होणार आहेस. बघू बोट?"
 आईने बोट बघितलं तर ते काळं निळं पडून पुढंच पेर सुजलं होतं. मग काय त्याला पुन्हा घरी राहण्याची परवानगी मिळाली. पण दिवसभर वाचन करून घेतले. सकाळी उठून पुन्हा लवकर तयार होऊन निघाला.
 "अरे तुझं बोट दुखतयं ना?" आई म्हणाली.
 "कमी झालंय आता." शूजची लेस आवळत हृषी म्हणाला.
 "जातो गं आई." असं म्हणत क्रिकेटचं किट घेऊन निघाला.
 "आज धड ये रे." आई म्हणाली.
 पण आईचं बोलणं ऐकायला तो घरात होताच कुठे, सायकल घेऊन केव्हाच फाटकाबाहेर गेला.
 खेळून आल्यावर स्वारी अगदी खूश होती.
 "बाबा, माझा बॉल एकसारखा स्पीन व्हायचा. सर तर प्रत्येक बॉलला 'वेल बॉल' म्हणायचे."
 "अरे पण बोट दुखत होतं तरी कसा काय बॉलिंग करत होतास?" बाबा म्हणाले.
 "राहिलं बोट." असं म्हणत त्यानं कोपऱ्यात किट ठेवले आणि झटपट आवरून शाळेला निघाला.
 सरांनी केलेल्या कौतुकांनी हृषीकेशची बोटदुखी कुठल्या कुठं पळाली. क्रिकेट खेळताना बामणे सर त्याचं खूप कौतुक करतात. त्यामुळं हृषीकेश हल्ली खूश असतो. 'शब्द एक कौतुकाचा वर्षाव मग अभ्यासाचा.' हे त्याच्या बाबतीत खरं होऊ लागलंय. हृषीकेश अभ्यासाकडे पूर्वीपेक्षा जास्त लक्ष देऊ लागला.

***
२०