पान:सफर मंगळावरची.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेजस्वी चंद्रबिंब


 गॅलरीतून आई ओरडली, "अरे, आज चतुर्दशी, बघा चंद्र उगवला." ऋतुजा आणि हृषीकेश धावले.
 "अरे बापरे केवढा मोठ्ठा आहे चंद्र!"
 हृषीकेश आनंदाने ओरडला.
 "आज गच्चीवर जेवायला जायचं?" ऋतुजा म्हणाली.
 "हो जाऊ या की, मी लवकर आवरते स्वयंपाक. "
 आईनं भराभर स्वयंपाक केला. आठ वाजता गच्चीवर चटई अंथरूण सर्वजण बसले. लाईट लावला नाही. नेहमीच पावसाळा संपला की, ऋतुजाच्या आईला चांदण्यात जेवणाचं वेड लागतं. वरखाली धावपळ हौसेनं करते. आजचं चांदणं तर फारच तेजस्वी वाटत होतं. आकाश निरभ्र होतं. थंडगार मार्गशीर्षातली हवा. जेवल्यावर आणखी थंडी वाजते. म्हणून सगळ्यांनी स्वेटर घातलेले.
 "आज चतुर्दशी असून चंद्र किती मोठा दिसतोय. अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखा. "हृषीकेश म्हणाला.
 "अरे उद्या दत्तजयंतीची पौर्णिमा नं, म्हणून असेल." आईने हृषीच्या ताटात चपाती वाढत म्हणलं.
 "मला छोलेचा फक्त रस्सा दे मस्त झालाय." बाबा म्हणाले.
 "गच्चीवर जेवणाला नेहमीच चव येते." आई.
 "आपण उद्या पण यायचं का गच्चीवर जेवायला?” ऋतुजा म्हणाली."
 जरूर ! उद्याची पौर्णिमा तर फार वेगळी आहे." बाबा म्हणाले.
 "कसं काय ?" हृषीकेश म्हणाला.
 "दत्तजयंती आहे ना म्हणून." आई.
 "ते कारण नाही. दत्तजयंती दरवर्षीच येते. कारण वेगळंच आहे. "
 "कुठलं हो बाबा ?" हृषीकेश म्हणाला.
 सगळ्यांनीच कान टवकारले. बाबा सांगू लागले.

 "उद्या चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार आहे. उद्या चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये

१६