पान:सफर मंगळावरची.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " मानसी S, मानसी... "
 असं म्हणत सौरभ ओरडत होता. आईने हलवून सौरभला जागे करत विचारले.
 "अरे असा काय मानसीला हाका मारतोयस ? स्वप्न पडले की काय ?"
 "अगं ती मंगळावरच राहिली की, वेंधळी कुठली ? लवकर चढ म्हटलं तरी इकडे तिकडे बघतेय."
 सौरभ बडबडत घाम पुसत होता.
 "कोण राहिलं मंगळावर ? जागा झालास का? उठ बघू."
 आईने त्याला उठविले. सौरभ घाबरलेला. इकडे तिकडे बघत होता त्याच्या लक्षात आलं आपण यानात नसून घरातच आहोत. आपल्या झोपण्याच्या पलंगावरच. आईपण जवळच बसलीय.. सौरभला एकदम सुरक्षित वाटले. तो आईच्या कुशीत शिरला. धडधडतं काळीज शांत झालं. स्वप्नातील मंगळ, यान, अंतराळ, ती प्रयोगशाळा, त्यातील शास्त्रज्ञ असं बरंच त्याला आठवू लागलं.
 "चल दात घास"
 कुशीतून बाजूला करत आई म्हणाली.
 "आई मोठा झाल्यावर, मी नक्की जाणार अंतराळात "
 "जा की. पण त्यासाठी आतापासून तयारी करायला हवी. "
 "कसली तयारी ?"
 "पोहणे, योगा, प्राणायाम, ध्यान वगैरे. सध्या एवढं तरी कर पाया तरी पक्का होईल त्यामुळे. "
 "बापरे ऽ मग शाळा, अभ्यास कधी व्हायचा ?"
 "त्यासाठी लवकर उठायला हवं. चला. "
 "आई, उद्या मला लवकर उठव. बाबांच्याबरोबर मी पण जाईन पळायला."
 "पळणं तर हवंच. पण पोहायला चांगलंच यायला पाहिजे. कारण अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे पोहल्यासारखं तरंगायला होतं. "
 "खरंच की, मी पोहण्याच्या तलावापर्यंत, पळत जाऊन, पोहण्याचा सराव करीन, म्हणजे दोन दोन व्यायाम एकाच वेळी. हो की नय. एका दगडात दोन पक्षी."
 "माझं शहाणं बाळं” असं म्हणत आईनं त्याची पापी घेतली.

***
सफर मंगळावरची । १५