पान:सफर मंगळावरची.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "सौरभ, ठीक होईन ना रे सगळं ?"
 मानसी काळजीनं म्हणाली. पृथ्वीपासून लांब आल्याचे जाणवून तिला विलक्षण पोकळी जाणवली.
 "होईल गं. डोन्ट वरी, बी हॅपी. एन्जॉय कर. पृथ्वीशी संपर्क तर आहेच. लांब आलोय असं वाटतच नाही. थोडं एकटं वाटतयं खरं. "
 सौरभने तिला धीर दिला. तेवढ्यात ट्रीऽऽग घंटी वाजली. टी. व्ही. वर सर्व प्रयोगशाळा, शास्त्रज्ञ, दोघांचे आईबाबा वगैरे दिसत होते.
 "इकडे सर्व ठीक आहे" मानसी म्हणाली.
 “तुमची खाण्याची वेळ झाली की तुम्ही खाऊन घ्या. दोघे एकाच वेळेला झोपू नका. एकजण झोपला की दुसऱ्याने जागं राहायचं."
 “नाकाला नळकांडे लावायचे विसरू नका." मानसी हसत हसत पलीकडचं वाक्य तोडत म्हणाली.
 "बरं ऽ ओ. के. गुडलक" पृथ्वीवरून प्रयोगशाळेतील प्रमुख शास्त्रज्ञ श्री. कृष्णरावांचा आवाज आला.
 ४ डिसेंबर १९९६ ला अमेरिकेने 'मार्स पाथ फाईंडर' मंगळावर पाठवले होते. ते ४ जुलै १९९७ ला मंगळावर पोहोचले. तेव्हा सर्व दुनिया विस्फारीत नजरेनं ती मंगळावर फिरणारी बग्गी पाहात होते. आता तर प्रत्यक्ष मानवाचं पहिलं पाऊल मंगळावर पडणार होतं. भारताने तयार केलेले 'भगीरथ' मात्र पाच महिन्यात मंगळावर पोहचले. पावसाळ्यात थोडाफार पृथ्वीशी संपर्क तुटला तरी घाबरण्याचे काही कारण नाही. असं विभागप्रमुख शास्त्रज्ञ श्री. कृष्णराव यांनी सर्वांना सांगितलेले.
 अंतराळ प्रवासात एकदा मानसीच्या कानातून मळाचे खडे बाहेर आले. मानसी घाबरली. पण सौरभ म्हणाला, “अगं ते टेक ऑफ घेताना कानठळ्या बसून कानाला दडे बसले होते ना. त्यामुळे प्रसरण आकुंचन वगैरे होऊन मळ मोकळा झाला असेल. मोकळा म्हणून आला बाहेर. त्यात घाबरण्यासारखं कायेय ?"
 अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे चालताना हवेत तरंगायला व्हायचं. खाताना घास पटकन् तोंडात जाण्याऐवजी तरंगायचाच. हवेत म्हातारी (शेवरीचं बी) फिरते तसा घास फिरायचा. पाण्याचा थेंबदेखील तरंगायचा. दोघांना मजा वाटायची.

 मानसी-सौरभला घेऊन भगीरथ पाच महिन्यांनी मंगळावर उतरले. तिथे गेल्यावर आधी कोणी उतरायचे म्हणून दोघांचा वाद सुरू झाला. शेवटी पृथ्वीशी संपर्क साधल्यावर संदेश मिळाला, यानाला दोन दरवाजे आहेत. दोन्ही बाजूंनी दोघं

सफर मंगळावरची । १३