पान:सफर मंगळावरची.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होईल. तुझ्यापेक्षा तोच निवडला असता तर बरं झालं असतं. "
 "फिटनेसमध्येच काय पण प्रत्येक गोष्टीत मीच रोहितच्या पुढे होते, म्हणून माझी निवड झाली. इथे राखीव जागांची सवलत नव्हती बरं. "
मानसी तावातावाने बोलत होती.
 "अरे तुमची भांडणं कधी संपायची? तिकडे गेल्यावर कामं करायची सोडून असेच भांडणार का ?"
 सौरभच्या आईनं असं म्हटल्यावर मात्र दोघेही पटकन् उठले. दोघांचे आई- बाबा दिल्लीपर्यंत येणार होते. पण बाकीचा बालचमू, ओळखीचे लोक, नातेवाईक इथूनच निरोप देणार होते. स्टेशनवर जयदीप, रवी, मिलींद, प्राची, स्वप्ना, अभिजित, अनिल, मनिषा, धैर्यशील, योगिता, सर्वजण आले होते. सर्वांचे डोळे डबडबले होते. जडावलेल्या शब्दात 'बेस्ट ऑफ लक' म्हणून सर्वांनी निरोप दिला.
 प्रयोगशाळेत पुन्हा तपासण्या झाल्या. अन्नाचे डबे, औषध, पाणी, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑक्सीजनची नळकांडी वगैरे यानात नीट तपासून घेतले. मानसी - सौरभने अंतराळ पोशाख चढवला. आता मात्र दोघेही ओळखू येत नव्हते. सर्वजण गंभीरपणे तेथील धावपळ, हालचाली, निरखीत होते. दोघांच्या आया डोळ्यातून पाणी ओघळू नये म्हणून अट्टाहासाने मन काबूत ठेवत होत्या. भावनेला आवर घालत होत्या. त्यांची ही पिल्लं तब्बल आठ महिन्यांनी दिसणार होती. सुखरूप परतली तर...
 मानसी सौरभने पुन्हा आईबाबांना वाकून नमस्कार करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ते अंतराळ पोशाखामुळं नीट जमलं नाही. आईबाबांनी त्यांना जवळ घेतलं. "यशस्वी भव" "दिर्घायू भव" असं पुटपुटत आशीर्वाद दिले. दोघेही यानात बसले. भारतीय शास्त्रज्ञांनी यानाचं नाव 'भगीरथ' असं ठेवलेलं. 'भगीरथ' यानाने उंच झेप घेतली. कानठाळ्या बसवणारा आवाज झाला. अग्रिबाणाने 'भगीरथ' यानाला उंच फेकले. 'भगीरथ' आकाशस्थ झाले. सर्वजण टी. व्ही. कडे पळाले. 'भगीरथ' आता फक्त टी. व्ही. वरच दिसणार होतं.

 यानाने टेकऑफ घेताना पोटात गोळा उठला. कानाचे दडे बसले थोडा वेळ. मानसी आणि सौरभ भयचकीत होऊन बाहेरचं दृश्य बघत होते. धावते वर्णन करत होते. पृथ्वी आता निळसर दिसू लागली होती. आकाशात सगळीकडे अंधारच होता. तारे, ग्रहगोल लालसर तांबूस दिसत होते. एकीकडे सूर्यही तळपत होता. पण त्याचा प्रकाश मात्र नव्हता. सगळीकडे अंधार, अंधार होता. मंगळावरदेखील फक्त चार तास प्रकाश असतो. नाहीतर फक्त अंधार.

१२ सफर मंगळावरची