पान:सफर मंगळावरची.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वासाची. रूक्मिणीला जाग आली. तिला घाम आल्यामुळे थकवा जाणवत होता. पण ताप उतरला होता. ती उठून बसली. राहीनं मडक्यातलं पाणी दिलं. सांताक्लॉजने कमरेचा बटवा काढला न् रूक्मिणीला थोडे पैसे दिले. तिला म्हणाला,
 " औषधपाणी कर, नीट राहा. ताजं अन्न खा."
 “दादा तुमच्या रूपानं विठूमाऊलीच घरी आली. साक्षात नारायण घरी आला. त्याला उपाशी कशी जाऊ देऊ. बसा वाइच. काय तरी करते. "
 सांताक्लॉजला तिचं मन मोडवेना. तो बसला. रूक्मिणीनं गाडगी मडकी शोधली. एका गाडग्यात थोड्या कण्या सापडल्या. सांताक्लॉजला 'भूक' लागलेलीच. तो राहीशी गप्पा मारत बसला. राहीचे प्रश्न सुरू झाले.
 "आजोबा दरवर्षी अशा भेटवस्तू का वाटता ?”
 "येशूख्रिस्ताचा वाढदिवस ना म्हणून वाटतो. तुम्ही कसं कृष्णाष्टमीला दहीहंडी करता तसं."
 " आजोबा कुठे झाला येशूख्रिस्ताचा जन्म ?"
 "बेथलहेम ह्या गावात."
 "मला येशूची गोष्ट माहीत नाही. सांगा ना."
 "हो दादा सांगा ना मला पण ऐकायचीय. "
 सांताक्लॉज गोष्ट सांगू लागला.
 "नाताळचा सण आणि नविन वर्षाचे स्वागत, सरत्या वर्षाला निरोप देत उत्साहाने जगभर साजरे करतात. या सणाला ख्रिसमसही म्हणतात. ख्रिसमस म्हणजे ख्रिस्ताचा जन्म.

 मारिया हिचे योसेफ नावाच्या माणसाबरोबर लग्न ठरले होते. तिला स्वप्न पडले की, तुझ्या पोटी पवित्र आत्मा जन्म घेणार आहे. तू घाबरू नकोस. प्रभूची तुला समर्थ साथ आहे. त्यामुळे लग्नाआधी गर्भवती असलेल्या मारियाची काळजी. मिटली. तिचं लग्न झालं. तिचा नवरा योसेफच्या लक्षात आलं, मारिया गर्भवती आहे. त्यामुळे त्याला फार दुःख झालं. परंतु तो धार्मिक वृत्तीचा असल्यामुळे उघडपणे त्याने मारियाचा अपमान न करता तिला गुप्तपणे, तिच्या नकळत सोडण्याचा विचार केला. योसेफ या गोष्टीचा विचार करीत असतानाच प्रभुच्या दुताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा तू आपली बायको मारिया हिचा स्वीकार करायला भिऊ नकोस. तिला पवित्र आत्म्यापासून

१२६ । सफर मंगळावरची