पान:सफर मंगळावरची.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सांताक्लॉज आणि राही.


 त्या वर्षी दुष्काळ पडलेला. गरीब लोकांचे हाल होत होते. गावाच्या एका बाजूला गरीब लोकांच्या झोपड्या, छोटी घरं होती. तिथंच राही आणि तिच्या आईची झोपडी होती. राहीच्या आईचं नाव रूक्मिणी होतं. घरात दोघीच रहात असत. रूक्मिणी शेतात मजुरी करायची. त्याच्यावर दोघींच भागायचं. पण सध्या दुष्काळामुळं शेतातली कामं मिळेनाशी झालेली. त्यात त्यांना दूरवरून पाणी आणावं लागायचं. पाणी आणल्यावर मग कुठं काम मिळतंय का बघायचं. नाहीतर शेरडं, गुरं राखोळी घ्यायची. ती रानामाळावर हिंडवायची. त्यांना राखत राखत झाडाझुडपात फिरून लाकडं गोळा करायची. त्याच्या छोट्या छोट्या मोळ्या बांधायची. त्या विकायची. या कामाचं तिला कधी धान्य मिळायचं तर कधी पैसे. जोंधळं मिळालं तर ती ते भरडून कण्या शिजवायची. कुणी ताक दिलं तर त्यांचा सणच साजरा होई. कधी नुसताच भात शिजवून खायचा. असे दिवस चालले होते. या अती कष्टामुळे आणि कुपोषणामुळे ती सतत आजारी पडायची. मग काम बंद, रोजगार बंद, पैसे येणे बंद. मग घरात काही मूठभर धान्य असेल तर राही त्याचं काहीतरी खाण्यासारखं करायची. तांदूळ असले तर भात शिजवायची. त्याचीच पेज करून आईला द्यायची. एकदा तेही संपले. मग ती शेजारी गेली. आई आजारीय असं सांगितलं. शेजारी खडाखडीच. तेसुद्धा गरीबच होते. पण कमावणारे हात चालू असले तर काही ना काही असतं, थोडंफार शिजतं. शिजलेले जास्त असेल तर तेही मिळतं. राहीची तेवढी वेळ तरी निघते. एक तर ती लहान असल्यामुळं तिला आईसारखा कोंड्याचा मांडा करता येत नसायचा. आईला आजारपणामुळे तोंडाला चव नसायची. मग ती नीट जेवायची नाही. राहीला मग वाईट वाटायचं. तिला वाटायचं आईनं भरपूर खाऊन पटकन बरं व्हावं. पण आज शेजारणीच्या घरात जास्तीचं काही शिजलं नव्हतं. मग तिनं घरातली गाडगी शोधली. तर पसाभर हुलगे सापडले. तेच तिनं राहीला दिलं. आणि सांगितलं ह्याचं माडगं करून घाल तुझ्या आईला. कसं करायचं ते तिनं विचारून घेतलं. घरी येऊन त्याप्रमाणे तिनं केलं. माडगं पिल्यावर आईला हुशारी

१२४ । सफर मंगळावरची