पान:सफर मंगळावरची.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बाजीरावनं तिला बैलगाडी दिली. तिनं हरकून ती बैलगाडी घेतली न् निघाली. पण हातात गाडी घेऊन गवताचा भारा उचलावा कसा ? तिला तर सोन्यासारखी गाडी खाली ठेवू वाटेना. ह्या तिरसींगरावाला वझं उचलू लाग तरी कसं म्हणावं. आधीच गाडी देऊन उपकार केल्यातंय. कुणी हाय का जवळपास हात लावायला वझ्याला, म्हणून ती इकडं तिकडं बघू लागली.
 "मावशी, उचलू लागायचं का?"
 "व्हय हो, पण हिथं कुणीच दिसंना. "
 बाजीराव उठला त्यानं तिच्या डोक्यावर ओझं उचलून दिलं. मग हातात बैलगाडी दिली. ती गाडी हातात घेताना केवढा मोठा जीव झाला तिचा.
 असा हा बाजीराव, त्याच्या मनात असलं तर तो कुणाला काही द्यायचा न्हायतर नाही. त्याला झाडपाल्याची काही औषधं माहीत होती. दवाखान्याचा गुण येईना की खेडूत, शेतकरी त्याच्याकडे यायचे. औषधाच्या खर्चापुरते पैसे घेऊन तो औषध तयार करून द्यायचा. पण कुणाला ते औषध कसं तयार केलंय ते सांगायचा नाही. कडबाशिल्प पण अशीच वाटून टाकायचा. विकत मागितली मात्र शिव्या द्यायचा.
 बाजीराव म्हातारा झाला. त्याला आता काम होईनासं झालं. तो खोपटातच पडून रहायचा. बाजीरावला तुकाबापूनं काढून टाकलं नाही. दुसरा सालगडी बघितला. शेताला राखण होत होती. आणि आता तो जाणार तरी कुठं ? म्हणून त्याला त्याच खोपीत ठेवलं. जेवण पाठवून द्यायचा. नंतर नंतर बाजीरावाचं चालणं फिरणं बंद झालं. बाजीरावला वाटायचं आपण मालकाचं फुकटचं खातोय. खायला कार न् धरणीला भार. या जगात आपलं असं रक्ताचं, नात्यातलं कोणच नाही. अंथरूणाला खिळून राहिलो तर आपला गूमूत कोण काढील ही चिंता त्याला सतावत राही. मग त्यानं काहीतरी मनाशी ठरवलं. ते कुणालाच कळलं नाही. मालकाने दिलेले जेवण तो गायीला, कुत्र्याला खाऊ घालायचा. असं बरेच दिवस उपाशी राहिला. एकेदिवशी मालक त्याचं जेवण घेऊन आला तर हा अंथरूणातच मरून गेलेला. त्याने कुणाच त्रास दिला नाही. असा हा हाडाचा कलाकार. त्याच्या कलाकारीमुळं लोकांच्या लक्षात राहिला. कलेमुळं माणसाला अशाप्रकारे अमरत्व येतं.

***
सफर मंगळावरची । १२३