पान:सफर मंगळावरची.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ट्रकवाल्यानं खिशातून शंभराची नोट काढली न् म्हणाला,
 "हे बघ आधी पैसे देतो. हा नसला द्यायचा तर नको देऊस. दुसरा असाच करून दे."
 "ते पैसं ठिवा तुमच्याजवळच. दुसरा करीन का न्हाय ते मला न्हाय म्हाइत. आसं कुणाला बांधील न्हात न्हाय मी." बाजीराव त्याच्यावर खेकसला.
 " काय राव तुमी तर लय भाव खाताय. पण कराच एक टरक आमच्यासाठी. शंभर गावातली लोकं बघत्याली. कौतुक करत्याली. "
 "जा आता तुमी. रस्त्यात लय उशीर टरक उभा केलाय. येणारी जाणारी लोकं मलाच शिव्या घालत्याली."
 ट्रकवाला मनातल्या मनात बाजीरावला शिव्या देत गेला.
 एक बाई डोक्यावर गवताचा भारा घेऊन निघालेली. बाजीरावच्या खोपटाबाहेरचा डेरा बघून थांबली. आणि बाजीरावला म्हणाली,
 "बाजीराव, पाणी हाय का वायच ? मायंदाळी तहान लागलीय. "
 "व्हय, व्हय हाय की, घ्या डेऱ्यातलं."
 बाजीराव त्याच्या कामात, वर न बघताच तिला म्हणाला.
 त्या बाईनं गवताचा भारा खाली टाकला. पाणी प्यायली. जीव थंडगार झाला. पदरानं तोंड पुसीत ती बाजीरावने केलेल्या वस्तू न्याहळू लागली. ती बिनआवाजाची गपचीप बसलेली पाहून बाजीराव म्हणाला,
 "मावशी काय बघताय ?"
 "आता बया बघण्यासारखं केल्यावर नकू का बघायला."
 ती तशीच बसली. मागावं का नको मागावं ? असा विचार करीत बसली. नंतर मनाचा धडा करून म्हणाली,
 "बाजीराव, माझा ल्योक भारी हुशार हाय. त्याला शिकावचिला का ? आता सुट्टी पण हाय."
 "कितीसा मोठाय ?"
 " धाअकरा वरसाचा आसल की. "
 "ल्हानय अजून. आसं करा ही गाडी त्याला न्या. कसा खेळतुया बघा.
 मोडतोड केली तर खवळू नका. शिकायचं म्हणाला तर शिकवू. "
 "आगं बया तुमी तर लय मोठ्या मनाचं हायसा की."

 " निघा आता माझा खोळंबा हुतूया."

१२२