पान:सफर मंगळावरची.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाजून झाडाच्या सावलीत बांधायचा. त्यांच्या पुढं वैरण, गवत टाकून स्वतः खोपटात वारंघशी बसायचा. त्याचं कलाकारीचं काम करीत. बैलगाडी, ट्रक, ट्रॅक्टर, एस.टी, बस, जीप, घरं, बंगले, असं बरंच काही बनवायचा. एकदा त्याला खेळण्यातला चष्मा घावला. त्याच्या काचांनी ट्रकच्या पुढच्या बाजूच्या खिडक्या तयार केल्या. तसं ह्या शिल्पकलेत रंग वापरत नसायचा तो. पण ट्रकला रंगीत काचाच्या खिडक्यांनी सुंदर रूप आलं. एकदम झ्याँक दिसू लागला ट्रक. तो ट्रक तयार करून बाजूला ठेवला आणि दुसरी वस्तू करू लागला. तेवढ्यात एक ट्रक त्याच रस्त्याने निघालेला. ट्रकचं ते कडबाशिल्प बघून ट्रकवाला थांबला. रस्त्याच्या एका बाजूला ट्रक उभा करून तो खोपटाकडं आला. खोपटात पाण्याचा माठ बघून नेहमीच असे वाटसरू पाणी प्यायला यायचे. बाजीराव कडबाशिल्प करण्यात गुंगून गेलेला. ट्रकवाला पाणी प्याला. तरी बाजीराव आपल्याच कामात मग्न. त्याचं ट्रकवाल्याकडं लक्षच नाही. मग ट्रकवाल्यानंच त्याला विचारलं,
 "केवढ्याला टरक दिला, पावणं ?"
 "इकायला न्हाय केला. " त्याच्याकडे न बघताच बाजीराव म्हणाला.
 "मग कशाला करतूयास इतकं सार?" तिथल्या तशाच केलेल्या वस्तूकडे बघत ट्रकवाला म्हणाला.
 "मला करायला येतं. करावंसं वाटतं. जीव रमतो ह्याच्यात माझा." बाजीराव म्हणाला.

सफर मंगळावरची । १२१