पान:सफर मंगळावरची.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कडबाशिल्प


 चैत्राचं ऊन रणरणत होतं. सुगी संपल्यामुळं रानं मोकळी होऊन ऊन्हं पित होती. कुठे कुठे नांगरट चाललेली. पण ऊन्हाची काहीली एवढी की बैलं धापा टाकायची. त्यांच्या तोंडाला फेस यायचा. टॅक्टरवाला नांगरत असेल तर तोही घामाघूम व्हायचा. मग अशावेळी झाडाखाली नाहीतर खोपटातल्या सावलीत विसाव्याला जावसं वाटायचं. तुकाबापूकडे सालगडी असलेला बाजीराव दुपारी विसाव्याला बसायचा. त्याची विश्रांती म्हणजे कामात बदल. शांत बसून रहाणं त्याला ठाऊकच नाही. वैरणीची वाळलेली पिवळी ताटं गुरांनी खाऊन इकडं तिकडं पडलेली. ते तुकडे गोळा करून आणायचा. ताटांचा पालापाचोळा काढून साफ करायचा. मग ती ताटं सोलायचा. सोललेल्या चोयट्यांचा उपयोग तुकडे जोडण्यासाठी टाचणीसारखा करायचा. ज्वारीच्या ताटातला मऊ गाभा, या चोयट्यांनी सहजपणे जोडला जायचा. . मॅकॅनोपासून जशा सोप्पेपणाने वस्तू तयार करता येतात. तशा या गाभ्यापासून हवी ती वस्तू बाजीराव करायचा. आजूबाजूला जेवढ्या म्हणून वस्तू दिसायच्या तशा तो हुबेहुब वस्तू बनवायचा. या कलेला तसं पुस्तकी नाव काय होतं माहीत नाही. रानाशिवारातली ही कला. पुस्तकात नाव यायचं काहीच कारण नव्हतं. कडबाशिल्प म्हणू या आपण, या कलेला.

 बाजीरावाची रानात रस्त्याच्या कडेला खोप होती. ती खोप त्याचे मालक तुकाबापूंनी त्याच्यासाठीच बांधलेली. बाजीराव एकटाच असल्यामुळे जिथं काम करेल तिथंच त्याचा मुक्काम असायचा. शेतात खोप बांधली की शेताची, गुराढोरांची राखण होते. मालकाच्या घरातील कोण आलं तर घटकाभर पाणी प्यायला, दुपारंचं थोडं पडायला त्या झोपडीचा उपयोग होत असे. एरवी त्या खोपटाचा मालक फक्त बाजीरावच असे. शेतात रस्त्याच्या कडेला त्याचं खोपटं होतं. तिथं सावलीत एका बाजूला पाण्याचा डेरा (माठ) भरून ठेवलेला असायचा. जेवण त्याचा मालक तुकाबापू घरून करून आणायचा. खोपटाच्या बाहेरच्या अंगाला तीन दगडांची चूल केलेली. त्यावर शेरडीचं दूध घालून चहा करायचा. पितळी भरून चहा पिल्यावर त्याला लवकर भूक लागायची नाही. सकाळी गुरं फिरवून आणायचा. उन्हाचं पाणी

१२०