पान:सफर मंगळावरची.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दार लावून घेतलं. पोराच्या अंगावर पांघरून वगैरे नीट आहे का बघावं म्हणून त्यांनी दिवा लावला. तर पोरगं तिथं नव्हतंच. मालकिणीच्या लक्षात आलं आपले सुपुत्र अजून घरी आलेलेच नाहीतं. आणि हे काम त्यांचेच असणार. आणि पुस्तक कुठं जाणार नाही याचीही खात्री वाटली. तरीपण गरीबाला कशाला छळायचं ?
 मालक पारावर गेलं. तिथं पोरांचा कालवा चालला होता. आधीच झोपमोड झाल्यामुळे मालक चिडलेले. तो सगळा ताव त्यांनी पोरांवर काढला. पोरांना शिव्या घालत म्हणाले, "कुणाजवळ पुस्तक आसलं तर द्या चटशिरी, न्हायतर पेकाटच मोडीन एकेकाचं." साक्षात मालकच आल्यामुळं पोरांनी पटदिशी पासबुक काढून दिलं. मालकांनी ती दौलत विठूजवळ दिली. अन् पोरांना म्हणाले, “अरे गाढवांनो, गरीबाची चेष्टा करून काय मिळतं रे सुकळीच्यांनो. तो कशासाठी पैसे साठवतोय माहित्येय का?" 'नाही.' पोरं एका सुरात ओरडली.
 " त्याच्या पुतण्याला शहरात शिकायला ठेवलंय. त्याच्या शिक्षणासाठी पैसं साठवतोय हा. एका अपघातात त्याचा भाऊ भावजय वारले. ह्याला आईवडिल पण न्हायत. आता फक्त पुतण्या न् हा जिवंत हायत. हा अडाणी. त्यानं मग पुतण्याला शिकवायचं ठरवलंय. सोतासाठी तो कायच करत न्हाय. लगीन सुदीक केलं न्हाय. अशा गरीबाला मदत करायची सोडून उंडग्यांनो, तरास देताय व्हय?"
 पोरं शांत झाली. त्यांना स्वतःची चूक उमजली. मालक घरी जायला निघाले. बिगीबिगी विठू त्यांच्याकडं गेला. न् म्हणाला. “मालक माझ्याजवळ चोरत्याती हे. तुमच्याजवळ ठिवा." मग मालक ते पासबुक घेऊन गेले, तर आता नवाच त्रास सुरू झाला. आठवण झाली की, हा म्हणायचा दाखवा पासबुक. हातातलं काम सोडून ते पासबुक ह्याला दाखवायला लागायचं. मालक वैतागायचे. एकदा तर सगळे झोपलेले. हा दरवाजा वाजवू लागला. जोरजोरात हाका मारू लागला. मालक मालकीण घाबरून गेले. दार उघडून बघताहेत तर हा उभा. सगळ्या विश्वाची चिंता त्याच्या चेहऱ्यावर दाटून आलेली. तो मालकांना म्हणाला, "मालक त्या पासबुकात खरंच पैसं हाइत ना?" मालकाने कपाळावर हात मारून घेतला.

(एका सिंधी कथेवर आधारीत.)

***
सफर मंगळावरची । ११९